
अनेक इस्लाम धर्मीय राष्ट्रांप्रमाणे इराणमध्येही हिजाबबाबत कडक कायदे आहेत. हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना शिक्षा दिली जाते. हिजाबविरोधात इराणमध्ये अनेक महिलांनी आंदोलने केली असली तरी हिजाब सक्ती कायम आहे. येथील महिलांवर हिजाब सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला असल्याचा खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात करण्यात आला आहे.
ड्रोन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि चेहऱ्यावरून ओळख करणाऱ्या अॅपचा वापर करण्यात आला. तसेच इराणच्या कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर नजर ठेवली जात असून त्यांच्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे. सरकारचे या कारवाईस समर्थन आहे. नाझर या मोबाईल अॅपद्वारे कपडय़ांबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची माहिती पोलिसांना मिळते, असे अहवालात नमूद आहे.
संयुक्त राष्ट्राने दोन वर्षे संशोधन केल्यानंतर महिलांप्रती मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवला आहे. नाझर अॅपद्वारे हिजाब परिधान न केलेल्या महिलांना हेरून त्यांची वैयक्तिक माहिती शोधली जाते. त्यानंतर ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाते. सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील वाहने, रुग्णवाहिका आणि टॅक्सीमध्ये हे अॅप इन्स्टॉल करण्यात आले आहे. त्यानुसार कोणत्या महिलेने हिजाब परिधान केला नाही याची माहिती गोळा केली जाते. दरम्यान, अद्याप इराण सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता इराणने हिजाब सक्ती अधिक कडक केली होती.