अमित बाईंगचे ‘सिटीत गाव गाजतंय…’ 

एखादे सुरेल गाणे नेत्रसुखद बनवण्यात कोरिओग्राफी महत्त्वाची भूमिका बजावते. मराठमोळय़ा अमित बाईंग या कोरिओग्राफरने आजवर मराठी-हिंदीतील बऱ्याच कलाकारांना आपल्या तालावर नाचवले आहे. अभिनेता श्रेयस तळपदेच्या ‘चल भावा सिटीत’ या नवीन कार्यक्रमाचे ‘सिटीत गाव गाजतंय…’ हे शीर्षकगीत सध्या खूप गाजतेय.

या गाण्याची कोरिओग्राफीही अमितने केली आहे. 2019 मध्ये ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या गाण्याची कोरिओग्राफी केल्याने अमितचे नाव झी मराठी वाहिनीसोबत जोडले गेले. त्यानंतर त्याने 25-30 गाणी केली. कलर्स मराठीसाठी ‘बिग बॉस मराठी 1-2’ आणि सोनी मराठी वाहिनीसाठीही अमितने गाणी केली आहेत. ‘सिटीत गाव गाजतंय’ हे अमितने श्रेयससाठी कोरिओग्राफ केलेले दुसरे गाणे आहे. सर्वप्रथम ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या गाण्यासाठी अमितने श्रेयससोबत काम केले होते.