
बलूच लिबरेशन आर्मीच्या (BLA) दहशतवाद्यांनी मंगळवारी क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्प्रेसवर हल्ला चढवत ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर आता बीएलए दहशतवाद्यांनी दावा केला की, त्यांनी रेल्वे हायजॅक दरम्यान पकडलेल्या 214 पाकिस्तानी ओलिसांना ठार मारले आहे. बीएलएने पाकिस्तानी सरकारला बलुच राजकीय कैद्यांना सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही बलुच राजकीय कैद्यांना सोडण्यात न आल्याने ओलिसांना ठार मारले, असं बीएलए दहशतवाद्यांनी म्हटलं आहे.
बीएलए दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारवर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यास नकार दिल्याचा आरोप केला. दरम्यान, बीएलएने त्यांच्या दाव्याचा कोणताही पुरावा शेअर केला नाही. पाकिस्तानने बीएलएचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.