‘न्यू इंडिया बँके’ अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला गुजरातमधून अटक

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहारातील 12 कोटी रुपये देढियाला याच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथून कपिल देढिया याला अटक करून शनिवारी मुंबईत आणण्यात आले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायलायने देढिया याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही याप्रकरणातील पाचवी अटक आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. कर्जवाटप आणि ठेवी घेण्यासह बहुतांश व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. तसेच पुढील सहा महिन्यांपर्यंत हे निर्बंध असणार आहेत.