किस्से आणि बरंच काही – कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन

>> धनंजय साठे

आजच्या सुपरफास्ट युगात आपण कितीतरी आनंदाच्या क्षणांना मुकत आहोत.
छोटे-छोटे आनंदाचे क्षण हरवल्यासारखे वाटतात. जगण्यातील ती निरागसता, ते अप्रूप आणि सुखाची ऊब आपणच आपली शोधायला हवी.

आज तंत्रज्ञान जगाला कुठल्या कुठे घेऊन गेलं खरं, पण सामान्य माणसांचे छोटे-छोटे आनंदाचे क्षण मात्र कुठे तरी कोपऱयात सोडून गेलंय. आठवून बघा ते लहानपणीचे दिवस, जेव्हा आपले आईबाबा आपल्याला सरप्राइज देत इडली, डोसा, मेदूवडा खायला हॉटेलमध्ये घेऊन जायचे. मी तर मित्रांमध्ये दवंडी पिटायचो की, आज संध्याकाळी मी क्रिकेट खेळायला येणार नाही, कारण आम्ही डोसा खायला जाणार आहोत. आईने ताकीद दिलेली असायची की गृहपाठ संपवला तरच बाबा डोसा खायला नेणार. त्या दिवसांमध्ये किती निरागसता होती. आजच्या काळात त्याच वयाच्या मुलांना डोसा खायला जायचं याचं ना अप्रूप राहिलंय, ना चर्चेचा विषय आहे. आज सर्रास हाटेलमध्ये जाणं होत असल्याने आणि आजची आई पटकन पैसे काढून देणारी असल्याने पैशाची किंमत राहिलेली नाही. तो मनाचा सालसपणा, ती निरागसता कुठे तरी हरवलेली आहे. दुर्दैवाने…

पूर्वी दूरदर्शनवर `छायागीत’ किंवा नंतरच्या काळातलं `चित्रहार’ लागायचं तेव्हा जवळ जवळ रस्ते निर्मनुष्य असायचे. आज आपल्याला हवी ती गाणी हवी तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून बघता येतात. ऐकता येतात. पण मिळेल ती गाणी पाहून त्यात आनंद मानून इतक्या खुशीने ती `छायागीत’मधली गाणी पाहिली जायची ते क्षण आज आपल्या आयुष्यात येऊ शकतील का? निश्चितच नाही! त्या वेळेची, काळाची किंमत काही और होती.

आजची पोरं फिरता फिरता मॉलमध्ये जातात. एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाऊन तासन् तास बसून कॉफी पितात आणि ती कॉफी बहुसंख्य वेळा एखाद्या मध्यमवर्गीयाला विकत घेण्याआधी निदान चार वेळा विचार करायला लावणाऱया किमतीची असते. हा सहजपणा आज दिसतो खरा. काहीजण म्हणतील की, सध्या स्पेंडिंग पॉवर वाढली आहे. तर तसं आमच्याही लहानपणी सामान्यांच्या मासिक उत्पन्नाच्या मानाने बऱयाच गोष्टी उपलब्ध असायच्या. पण फरक असा की घरातली एकूण परिस्थितीचा आणि आईवडिलांनी दिलेल्या संस्काराप्रमाणे आमचा हात खिशात जायचा. आजचे युवक इतका विचार नाही करत बसत.

पूर्वी आम्हाला सिनेमा बघायला जाणं म्हणजे जणू सोहळाच असायचा. किती त्या अटी… परीक्षेत अमुक इतके मार्क्स आलेच पाहिजेत, गृहपाठ झालाच पाहिजे आणि दुपारी आई जबरदस्तीने दामटवून झोपायला लावायची. सिनेमागृहात गेल्यावर व सिनेमा सुरू झाल्यावर आईकडे भूक लागली हे गाणी सुरू केलं की आईने घरूनच निघताना डब्यातून पोळी भाजी, बिस्कीट्स, तीसुध्दा फक्त ग्लुकोज किंवा मारी यापैकी द्यायची. पाण्याचे पेले पण पिशवीतून आईने घरूनच आणलेले असायचे. अनेकदा प्रेक्षागृह हाऊसफुल्ल पाहायला मिळायचं. आता ते दिवस गेले. आता घरी बसून आपण आपल्या टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपवर आपल्या सवडीने हवे तेव्हा सिनेमे बघू शकतो. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे निश्चितच. पण लहानपणीचा तो आनंद जगावेगळाच होता.

सकाळी लवकर उठून थिएटरवर पोहोचून क्वचित प्रसंगी पोलिसांच्या लाठीचा मार सोसून जेव्हा सिनेमाची तिकिटं मिळवली जायची तेव्हा एखादा गड सर केल्याचा आनंद व्हायचा. ओहो…हो वो भी क्या दिन थे…! मुळात तेव्हा तंत्रज्ञान आजच्या इतकं विकसित न झाल्यामुळे आयुष्य खूप साधं, सरळ, निरागस आणि बऱयापैकी तणावमुक्त होतं. जसजशी माध्यमे वाढत गेली, मंच उपलब्ध होत गेले आणि सरसकट भावविश्वाचा पसारा वाढत गेला… तसं तसं भोळेपणा, निरागसतेचा अस्त होत गेला. पूर्वी दैनंदिन मालिका नव्हत्या. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यामुळे अगदी संध्याकाळच्या बातम्यासुद्धा घरकाम करणारी बाई आ वासून बघत राहायची. आज 24 तास बातम्या अनेक वाहिनींवर उपलब्ध असतात. नावीन्य कसं टिकून राहणार. आपल्याला हवं तेव्हा हवा तो कार्पाम आपल्या सोयीप्रमाणे पाहायला मिळत असेल तर त्या गोष्टीची किंमत कशी राहील? आज माणसाच्या आयुष्यातून ठेहराव गायब झालाय. गोष्टी मिळवणं जेव्हा सोपं होऊन जातं, मग ते पैशाच्या जोरावर असो वा तंत्रज्ञानाच्या, तेव्हा त्या गोष्टींचं मोल घसरतं.

आज कपडेसुद्धा ऑनलाइन मिळतात. उत्तम! पण बाजारात जाऊन घासघीस करून आपल्या आवडीचे नुसते कपडेच नाही घ्यायचे तर घरी परतताना भेळ खात, उसाचा रस किंवा आईपिम खात घरी येण्यात मज्जा होती, ती ऑनलाइन मागवण्यामध्ये मिळते का? या ठेहरावाचा तुटवडा नात्यांमध्येसुद्धा दिसून येते. पूर्वी मित्रामैत्रिणींचे वाढदिवस मध्यमवर्गीय कुटुंबातली पोरंसुद्धा त्यांच्या परीने साजरे करायचे. आजचे मध्यमवर्गीय `वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं व्हाट्सअॅप मेसेज पाठवून विषयच संपवतात.

अशी बरीच उदाहरणं तुम्हालाही आठवतील. पण या लेखाद्वारे इतकंच सांगायचंय की, तो छोटासा आनंद या सुपरफास्ट युगात कुठेतरी हरवला आहे. तंत्रज्ञान आपल्या जागी ठीक आहे.
पण… कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन…!