
>> गणेश आचवल
गिरगाव आणि विविध उत्सव यांचं नातं अतूट आहे. 1990च्या दशकात गिरगावात गणेशोत्सवातून अनेक वाद्यवृंद किंवा सांगितिक मैफली सादर व्हायच्या. अरुण लळीत यांचा मैफल वाद्यवृंद, घनश्याम दीक्षित यांचा स्वरसाज… अशा अनेक वाद्यवृंदांतून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळत होते. वाद्यवृंद असो किंवा संगीत नाटक, अल्बमचे रेकॉर्डिंग असो किंवा एखादा पुरस्कार सोहळा, या सर्व कार्पामांतून एक नाव परिचयाचं झालं आणि ते म्हणजे विनायक पंडित या तबलावादकाचं ! गेल्या पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ तो तबलावादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
विनायक पंडित हा गिरगावातील चिकित्सक शाळेचा विद्यार्थी. चौथीत असल्यापासून तो खेतवाडीत बळीराम पतंगे यांच्याकडे तबला शिकू लागला. तिथेच त्याची ओळख जगदीश मयेकर यांच्याशी झाली. जगदीशदादांनीसुद्धा विनायकला खूप प्रोत्साहन दिले. अनेक आंतरशालेय स्पर्धांतून विनायकने बक्षिसं मिळवली. गिरगावातील साहित्य संघात त्या काळी अनेक संगीत नाटकांच्या तालमी व्हायच्या. साहित्य संघातील अभ्यासिकेत विनायक अभ्यासाला जात होता. तो तबलावादन करतो हे तेथील अनेकांना माहीत होतं. यातूनच त्याला संगीत नाटकांच्या तालमींना तबलावादन सहाय्य करण्याची संधी मिळाली. साहित्य संघ निर्मित अनेक संगीत नाटकांत प्रत्यक्ष प्रयोगात गोविंदराव पटवर्धन ऑर्गन वादन करायचे, तर पंडित अण्णासाहेब थत्ते, पंडित भोजराज साळवी हे संगीतसाथ करायचे आणि त्यांच्या समवेत नाटकांमध्ये विनायकसुद्धा असायचा. त्यातून एक तबलावादक म्हणून विनायक खूप समृद्ध होत गेला. संगीत सौभद्र, संगीत मानापमान, धाडीला राम तिने का वनी… अशा अनेक संगीत नाटकांच्या तालमींसाठी त्याने तबलावादन केले. काही वेळा मुख्य प्रयोगातही त्याने तबलावादन केलं आहे. साहित्य संघात अण्णा पेंढारकर यांनी एका संगीत नाटकाच्या संदर्भात अभ्यापाम सुरू केला होता. तिथेसुद्धा त्याने तबलावादन केलं आहे.
हिंदुजा कॉलेजला असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून त्याने पारितोषिके मिळवली. बारावी पूर्ण होता होताच तो संगीत विशारददेखील झाला. विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानच्या अनेक संगीत नाटकांसाठी विनायकने तबलावादन केलं आहे. ताक धिना धिन, म्युझिक ट्रक, नाचू कीर्तनाचे रंगी, सारे सारे गाऊ या, किलबिल… अशा अनेक कार्पामांतून त्याने साथसंगत केली आहे. कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात तबला सहायक म्हणून तो नोकरी करू लागला. ती नोकरी ही विनायकच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी ठरली. अनेक मान्यवर मुंबई विद्यापीठातील संगीत अभ्यापामांना मार्गदर्शन करायला यायचे तेव्हा तबलावादक म्हणून विनायक साथसंगत करायचा. विनायक सुगम संगीतासाठी तबलावादन करत होताच, पण मुंबई विद्यापीठात कार्यरत असताना तो शास्त्राrय संगीताशीसुद्धा जोडला गेला. संगीतकार अशोक पत्की, अनिल मोहिले, श्रीनिवास खळे, नीलेश मोहरीर, वर्षा भावे अशा अनेक मान्यवरांच्या कार्पामांतून विनायक पंडित हे नाव परिचयाचं झालं. तो आकाशवाणीचा मान्यताप्राप्त तबलावादकदेखील आहे. विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानचा `उत्कृष्ट तबला साथीदार’ पुरस्कार तसंच गिरगावातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर यांच्यातर्फे यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कारही त्याला मिळाला आहे. विनायकला अनेक जण `प्रसाद पंडित’ या नावानेही ओळखतात. चिल्ड्रेन्स आकेडमी, कांदिवली शाळेत त्याने संगीत शिक्षक म्हणून काम केलं आहे. तसंच राधा ही बावरी, उंच माझा झोका, झेप, वहिनीसाहेब… अशा काही मालिकांत त्याने अभिनयदेखील केला आहे. संगीत ही साधना आहे आणि विद्यार्थ्यांना तबलावादनाचे प्रशिक्षण देताना एक वेगळं समाधान शिक्षक म्हणून मिळत असल्याचं तो आवर्जून सांगतो.
अनेक मान्यवरांकडून मिळालेली शाबासकी ही कलेला प्रोत्साहन देणारी असते, असे तो म्हणतो.
(लेखक मुक्त पत्रकार व आरजे आहेत)