
धूळवडी नंतर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात घडली आहे. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे अशी मृतकांची नावे आहेत. मृत्यू पावलेले पाच मित्र चिमूर तालुक्यातील साठगाव-कोलारी येथील आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या दुःखद घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण शनिवारी (15 मार्च 2025) दुपारचा सुमारास आले होते. जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे या पाच जीवलग मित्रांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्र बुडाले. घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्या पाच तरुणांचा शोध सुरू केला. स्थानिक मच्छीमारांची मदतीने पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आले असून बुडालेल्या पाच तरुणांचे मृतदेह सापडले आहे.
दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
या दुदैवी घटनेत गावंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन सख्ख्या भावांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यश आणि जनक असे त्या भावंडांचे नाव आहे. अनिकेत आणि तेजस हे त्यांचे चुलत भाऊ आहेत. घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्यांमध्ये आर्यन इंगोले हा तरुण सोबतीला होता. या दुदैवी घटनेत आर्यनने कसेबसे स्वतःला बुडण्यापासून वाचविले. त्याने डोळ्यादेखत पाच मित्रांना जलसमाधी मिळताना बघितले. या घटनेने तो पुरता हादराला. त्याने स्वतःला सावरत पोलिसांना घटनेची माहिती दिली.