
>> तुषार प्रीती देशमुख
ऐन उमेदीच्या वयात संसार एकटीने चालवण्याची वेळ आली तरी न खचता पतीने सुरू केलेल्या मसाल्यांच्या दुकानातील दुनियेत त्या रमल्या. मसाल्यांच्या प्रत्येक चवीचा आस्वाद ग्राहकांना दिला. त्या मसाल्यांच्या रंगांचा आनंद लुटत आयुष्यातले चवीचे रंग आज त्या आनंदाने अनुभवत आहेत. अशा या माधवीताई केळकरांच्या मसाल्यांची चवदार वाटचाल…
माधव दादांनी लहानपणापासूनच नोकरी करायची नाही हा ठाम निश्चय मनी धरला होता. त्यानुसार वयाच्या विसाव्या वर्षीच वडिलांना सांगून वडिलांबरोबर व्यवसाय करायचा ठरवले. 1975 साली मनोहर जोशी मुंबईचे महापौर असताना त्यांनी तरुण, होतकरू उद्योजकांना दादर (प.), रानडे रोडवरील अनेक स्टॉल्स मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यात माधव दादा व त्यांचे वडील गणेश केळकर यांनादेखील डॉ. अँटोनिया डिसिल्वा स्कूल कंपाऊंडला लागून एक स्टॉल मिळाला.
माधव दादांनी चार मसाल्यांचे योग्य प्रमाण शिकून घेतले. त्या मसाल्यांचे जिन्नस घरी आणून भाजून डंकिणीवर दळून घेतले. योग्य चव होईपर्यंत कष्ट घेतले आणि मग घरगुती चवीचे मसाले दुकानात पीसाठी ठेवू लागले. दादर स्टेशनसमोरील वर्दळीच्या रस्त्यावरील येणारी जाणारी लोकं `माधव स्टोअर्स’ या मसाल्याच्या दुकानाकडे पाहायची व भरलेल्या बरण्यांकडे आकर्षित व्हायची. ऑफिसला जाणाऱया महिलांनी सुरुवातीला मसाल्याची छोटी पाकिटं घेतली. वापरून पाहिली आणि मग किलोंमध्ये ऑर्डर द्यायला सुरूवात केली. मग त्या मैत्रिणींना `माधव स्टोअर्स’मध्ये मसाले विकत घ्यायला सांगू लागल्या.
सुरुवातीला माधव दादांनी दुकानात पीसाठी मोजकेच मसाले ठेवले होते. ज्यात प्रामुख्याने गोडा मसाला, खिचडी मसाला, सीकेपी मसाला असायचा. त्याचबरोबर थालिपीठाची भाजणी, लोणची, चटण्यादेखील असायच्या. माधव दादांनी केलेल्या मसाल्यांची चव सगळ्यांना आवडू लागली व बघता बघता त्यांचा व्यवसाय वाढू लागला.
माधव दादा एक उत्तम कलाकार असल्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ते ऑर्केस्ट्रामध्ये वाद्य वाजवायला जायचे. मुलाच्या जन्मानंतर संसाराच्या आर्थिक व्यवहाराची सर्व जबाबदारी स्वतकडे घेत माधवीताईंना फक्त घराची व मुलाची जबाबदारी त्यांनी दिली. परंतु मुलगा मंदार दहावीत असताना अचानक माधव दादा जग सोडून गेले. दुकानाचे पुढे काय? आता दुकान विकणार की काय? परंतु माधवी ताईंनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारून दुकान चालू ठेवायचा निर्णय घेता. त्यांचे दीर मनोहर केळकर व त्यांची वहिनी तसेच बहीण अंजली केळकर या दोघांनी माधवी ताईंने घेतलेल्या निर्णयाला साथ दिली. मुलाचे शिक्षण, संसाराचा आर्थिक डोलारा व नवऱयाने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगून अनुभव नसलेल्या माधवीताईने नवऱयाच्या निधनानंतर तेराव्या दिवशीच दुकानाची सर्व जबाबदारी स्वीकारली व जोमाने कामाला लागल्या. माधव दादांबरोबर त्यांच्या हाताखाली काम करत असलेल्या प्रवीण कांबळे या मुलाने माधवी ताईंना चांगली साथ दिली. तसेच वर्षानुवर्षे लाभलेल्या ग्राहकांनीही माधवी ताईंना चांगली साथ दिली. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माधवी ताईंनी दुकानात मसाल्यांमध्ये वैविध्य आणण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी जातीनुसार वेगवेगळ्या मसाल्यांची माहिती गोळा केली. मूल्य व दर्जा योग्य राहण्यासाठी माधवी ताईने मसाल्यांचे सर्टिफाइड प्रशिक्षणदेखील घेतले. दुकान सांभाळताना त्यांना अनेक अडीअडचणी आल्या. सुरुवातीला मालाचा अंदाज नसल्यामुळे अनेकदा त्यांना तोटादेखील सहन करावा लागला. न खचता न डगमगता त्यांनी प्रत्येक आव्हानांना स्वीकारून व्यवसायाला आपलेसे करून घेतले होते. त्यांनी व्यापाऱ्यांचे कधीच पैसे थकवले नाहीत. त्यामुळे त्यांच्या संकटाच्या वेळी त्या व्यापाऱयांनी खूप मोलाचे सहकार्य केले. माधव स्टोअर्समध्ये अनेक मसाले आहेत, ज्यात पावभाजी, बिर्याणी, पुलाव, पाचकळशी, संडे, फिश फ्राय, चिकन, भाजीचा मसाला तसेच इतर मसाले, वेगवेगळ्या प्रकारची पिठे, लोणची, वाळवणीचे पदार्थ मिळू लागले.
पाहता पाहता व्यवसायाची व्याप्ती वाढली. त्यात त्यांना मदतनीस पूर्वा राऊत यांची मोलाची साथ मिळाली. माधवी ताईंचा मुलगा मंदार याने नोकरी सोडून आपल्या घरातील व्यवसायाला हातभार लावायचे ठरवले. सर्व खरेदी करणे तसेच मसाले दळून आणण्यापासून पॅक करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. मंदारचे अंकिताशी लग्न झाले. दोघांच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी अंकिताच्या आई-वडिलांनी जावयाच्या दुकानातून मसाल्यांचे गिफ्ट पॅक करून सर्वांना दिले होते. माधवी ताईंसारख्या समाजात अनेक महिला आहेत, ज्यांनी व्यवसायाच्या जोरावर आपली मोडकळीस आलेली कुटुंबे सावरली आहेत. मसाल्यांच्या रंगात रंगून आपले आयुष्य सुखकर करणाऱया अशा सर्व स्त्रियांना मानाचा मुजरा.