मागोवा – म्हणे, महिला सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य!

>> आशा कबरे-मटाले

महिला दिनी `महिला सुरक्षेच्या प्राधान्या’चा ठणाणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याकडे एका इस्त्रायली पर्यटक महिलेसह अन्य एका भारतीय महिलेवरील बलात्काराची बातमी झळकते, ही भारतासाठी शरमेची बाब नव्हे का?

आंतरराष्ट्रीय महिला दिनी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर भारत सरकारची मोठी जाहिरात होती- `ती सक्षम होते आहे…’ `शी एम्पावर्स…!’ मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये नेहमीचे मथळे होते- `ती जगाते उद्धारी.’ बहुतेक व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर दिवसभर `हॅपी विमेन्स डे’च्या संदेशांची लयलूट झाली. दुसऱया दिवशी पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह गुजरातमधील महिला महामेळाव्याची बातमी होती. मथळा होता- `महिला सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य.’ आणि या बातमीखालीच दुसरी बातमी होती- `इस्त्रायली पर्यटकासह दोघींवर बलात्कार.’ महिला दिनाचा एक दिवसाचा ठणाणा किती पोकळ आहे याचं विदारक वास्तव अधोरेखित करायला एवढं पुरेसं आहे, नाही का?

कर्नाटकातील पर्यटन स्थळ `हम्पी’ इथे एका 27 वर्षीय इस्त्रायली महिला पर्यटकासह दोघींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची पार शनिवारी म्हणजे महिला दिनीच नोंदली गेली! या दोघीजणी एकटय़ा-दुकटय़ा नव्हत्या. सोबत तीन पुरुष पर्यटक असूनही त्या दोघी सुरक्षित राहू शकल्या नाहीत. घटनेचे तपशील असे… 6 मार्चच्या रात्री अकराच्या सुमारास हम्पीची एक महिला होमस्टे मालक तिच्याकडील चार पर्यटकांसह सानापूर तलावाजवळील तुंगभद्रा कालव्याच्या परिसरात बसली होती. पर्यटकांमध्ये एक इस्त्रायली महिला पर्यटक, एक अमेरिकी पर्यटक व दोघा भारतीय पर्यटकांचा समावेश होता. ताऱयांनी भरलेल्या आकाशाखाली गिटार वाजवत ते संगीताचा आनंद घेत होते. काही वेळातच मोटरसायकलवरून आलेल्या तीन स्थानिक तरुणांनी त्यांच्याकडे पेट्रोलसाठी पैसे मागितले. शंभर रुपये देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ करून त्या तरुणांनी या गटातील तिन्ही पुरुष पर्यटकांना कालव्यात ढकलून दिलं. त्यानंतर त्या तरुणांनी होमस्टे मालक महिला तसंच इस्त्रायली पर्यटक स्त्राrवर बलात्कार केला व त्यांच्याकडील मोबाइल, रोख रक्कम आदी घेऊन ते पळून गेले. कालव्यात ढकललेल्या तिघा पुरुष पर्यटकांपैकी अमेरिकी पर्यटक व नाशिकचा असे दोघे कसेबसे वाचले. परंतु ओडिशाच्या असलेल्या तिसऱ्या पर्यटकाचा मात्र मृतदेहच सापडला. लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या त्या दोन महिलांनी 7 मार्चला सकाळी पोलीस ठाण्यात पार नोंदवली. सोबत तीन पुरुष असूनही या महिला सुरक्षित राहू शकल्या नाहीत! काय कामाची ठरली आपल्या देशातील कथित प्राधान्याची `महिला सुरक्षा’ त्यांच्यासाठी?

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच एका 35 वर्षीय स्पॅनिश महिलेवर झारखंडमध्ये सात जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. ती आणि तिचा नवरा बाइकवरून भारतभरात हिंडत होते. हल्लेखोरांनी तिच्या नवऱयालाही बेदम मारहाण केली होती. गोव्यात 2017 साली बलात्कार करून ठार मारण्यात आलेल्या एका 27 वर्षीय ब्रिटिश-आयरिश तरुणीच्या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरूच आहे. कशासाठी यावं विदेशी पर्यटकांनी भारतात? भारतीय महिलांची तर एकटय़ा-दुकटय़ाने हिंडण्याची हिंमतच होणार नाही. आपल्या `संस्कृतीत’ही ते बसत नाही. बायकांनी कसं सोबत कुणाला तरी घेऊनच बाहेर पडावं, कुटुंबासह हिंडावं ही आपली रीत. एकटीदुकटी एखादी बाहेर पडली आणि असं काही विपरीत घडलं तर आपण `गेली कशाला होती एकटी…?’ असा जाब बिनदिक्कत तिलाच विचारू. सोबतीला एखादा `पुरुषमाणूस’ असेल तर सर्वसाधारणपणे भारतीय महिलांना तुलनेने सुरक्षित वाटतं. पण तेही पुरेसं नसतं असं आता हम्पीतील घटनेतून दिसतंय. `महिला सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य’ असं आपले पंतप्रधान म्हणालेत. काय केलं गेलंय प्राधान्याने? भारतीय दंडसंहितेऐवजी आता नव्याने अस्तित्वात आलेल्या `भारतीय न्यायसंहिते’मुळे म्हणे महिला अत्याचाराच्या घटनेसंदर्भात पार दाखल करणं अधिक सोपं झालं आहे. बलात्काराच्या गुह्यात 60 दिवसांत गुन्हे नोंद करणं व 45 दिवसांत निकाल देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने न्याय होईल असा दावा केला जातो आहे.

कायद्यातील हे बदल स्वागतार्ह आहेत. पण जेवढय़ा प्रमाणात बलात्काराच्या घटना समोर येतायत, तसे त्या प्रकरणांमध्ये वेगाने लागलेले निकाल येतायत का? वेगाने न्याय होईल तेव्हा कदाचित त्याचा थोडाफार परिणाम `लिंगपिसाट नराधमां’वर होईलही. पण कायद्यातील हे बदल तूर्तास तरी गुन्हा घडल्यानंतरच्या उपाययोजनाच वाटतात. बलात्काराच्या घटनेतील गुन्हेगारांना फासावर लटकवा अशी मागणी नेहमीच होते. कायद्यात कमाल शिक्षेची तशी तरतूदही आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी `स्वसंरक्षणार्थ’ आरोपीचं एन्काऊंटर केलं. ती घटना अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्या घटनेपाठोपाठ लैंगिक शोषणाच्या अन्य घटनाही समोर आल्या. पण नंतरच्या घटनांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही.

बलात्कार कुणावर झालाय, कुठे झालाय, यावर त्याने किती खळबळ माजणार हे अवलंबून असतं. एखादं प्रकरण माध्यमांमधून देशभर गाजतं. अशा चारदोन प्रकरणांच्या अधेमधे असंख्य प्रकरणं असतात, ज्यात पीडित महिला निव्वळ आकडेवारी बनून राहते. ना त्या प्रकरणाला माध्यमांमध्ये ठळक स्थान मिळतं, ना वेळेवर न्याय.

नोकरीकरिता पुण्यात राहणाऱ्या ग्रामीण तरुणीवर स्वारगेट बसस्थानकातील रिकाम्या बसमध्ये पहाटेच्या वेळी बलात्कार करण्यात आला. 24 तास प्रचंड वर्दळ असलेल्या बसस्थानकात अशी घटना घडू शकते म्हणजे निर्जन स्थळीच महिला असुरक्षित असतात असं नाही. आपल्याकडचे बलात्कार फक्त समाजकंटकांकडून होतात का? बापाकडून मुलीवर बलात्काराची प्रकरणं अधूनमधून समोर येत असतात. म्हणजे `नराधम’ घरातही असू शकतात. शिक्षकी पेशाचे कथित सुसंस्कृत पुरुषही असे कुकर्म करतात. अगदी लहानग्या मुलीही रिक्षाचालक, शाळेच्या बसमधील सहायकाच्या वासनेच्या बळी ठरतात. केंद्र सरकारकडून महिला सुरक्षेस दिल्या गेलेल्या कथित प्राधान्याचा तूर्तास तरी फारसा प्रभाव दिसत नाही. आता राज्य सरकारकडून महिला सुरक्षेसाठी `अॅप’ सुरू करण्यात येणार आहे. पाहू परिस्थितीत काही फरक पडतो का?

दरम्यान, बलात्कारी मानसिकता कशातून तयार होते आणि ती तयार होऊ नये, लैंगिक संबंधांकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन पुरुषांमध्ये तयार व्हावा म्हणून आपण काही करतो आहोत का? प्रतिवर्षी महिला दिनी आपण महिलांचा नको इतका उदो उदो करूच. पण जमल्यास अधेमधे याचाही विचार व्हायला हरकत नसावी.