
>> रविप्रकाश कुलकर्णी
पुण्याचे डॉ. अशोक कामत म्हटलं की लेखक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट संघटक कार्यकर्ते, फर्डे वत्ते अशी त्यांची बहुविध ओळख सांगता येईल. वयाच्या 83 व्या वर्षी (26 जानेवारी 2025) वयोपरत्वे त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या या गुणाबरोबरच आठवले ते म्हणजे त्यांनी उभारलेली गुरुकुल संस्था आणि त्या संस्थेद्वारे उभे केलेले काम. अशोक कामत यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे ते स्वत काम करतच, पण त्याचबरोबर दुसऱयांना काम करण्यास प्रवृत्त करत. त्यांच्याकडून काम करून घेत. उदाहरण द्यायचे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 50 जणांनी पीएच.डी. केलेली आहे! मंगेश कश्यप हे खरे तर विज्ञानाचे स्नातक. कामत सरांनी त्यांना पीएच.डी. करण्यासाठी सुचवले. विषय किर्लोस्कर मासिकाने केलेले वाङ्मयीन आणि सामाजिक कार्य. अर्थात मंगेश म्हणाले, “हे कसं शक्य आहे, मी कला शाखेचा विद्यार्थी थोडाच आहे?” पण कामत सरांची व्यूहरचना बिनतोड असायची. त्याशिवाय त्यांचे कुठलेही पाऊल पुढे पडत नसे. ते म्हणाले, “हे बघा आंतरशाखीय नियमानुसार, तुम्हाला या विषयात संशोधन करण्याची संधी मी मिळवून देतो. मग तर झालं?” कामत सरांनी मंगेश कश्यप यांच्याकडून काम करून घेतले आणि ते मग डॉ. मंगेश कश्यप झाले.
लेखक, पत्रकार म्हणून ख्यात असलेले सागर देशपांडे हे कामत सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळविलेले पन्नासावे आणि शेवटचे विद्यार्थी. कामत सरांकडे पीएचडी मिळवलेल्या प्रत्येक डॉक्टरची अशी वेगळी कहाणी सांगता येईल. संत तुकाराम यांच्यावर वेगवेगळ्या अंगाने कितीतरी लिहिले गेलेले आहे, पण त्यामानाने त्यांची पत्नी आवली यांच्याबद्दल किती माहिती मिळते? पुणे परगण्यातील लोहगाव येथील सधन सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या एवढाच संदर्भ मिळतो. मात्र एका लेखिकेला ही आवली खुणावू लागली. तोपर्यंत बाल साहित्यच लिहिणाऱया या लेखिकेला आश्वासक आधाराची गरज होती, पण भल्याभल्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांना टाळले. मग त्यांच्या मैत्रिणीने कामत सरांना भेटायला सांगितले. त्यांनी लेखिकेचा उत्साह तर वाढवलाच शिवाय त्या कादंबरीला विस्तृत प्रस्तावनाही दिली. ही कादंबरी गाजली आणि या कादंबरीशी त्या लेखिकेचे नाव कायमचे जोडले गेले. ही कादंबरी म्हणजे मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली `तुक्याची आवली.’ लेखिका मंजुश्री गोखले. यामुळे वेगवेगळ्या संतांवर लिहिण्याचा जणू त्यांना मार्ग सापडला. त्या लेखक म्हणून प्रस्थापित झाल्या. नवोदितांना वेळीच हात द्यायचा हा कामत सरांचा स्थायीभावच होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अशोक कामत यांनी त्या परिस्थितीवर मात केली.
त्यांनी हिंदी आणि मराठी विषयात पीएच.डी. केली, पण त्यांचे नाव झाले ते पुणे विद्यापीठातले संत नामदेव अध्यासन, संत अध्ययन व संशोधन केंद्रामुळे. मात्र आपले हे कार्य सांगताना ते कृतज्ञतेने म्हणत, नामदेव अध्यासन जाहीर झाले तेव्हा डॉ. इनामदारांना प्राध्यापकपद सहज प्राप्त झाले असते, पण त्यांनी मोठय़ा मनाने त्या पदासाठी माझे नाव विद्यापीठाकडे लेखी पत्र पाठवून सुचविले. हा कृतज्ञ भाव त्यांनी शेवटपर्यंत जपला. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात त्याचे प्रतिबिंब स्पष्ट उमटलेले दिसते. लेखक म्हणून त्यांची कामगिरी मोठीच आहे. तिथे त्यांनी संपादित केलेल्या अनेक पुस्तकात दिसतेच, पण त्यांनी लिहिलेले तीन खंडातील सिक्ख गुरुचरित्र असाधारण असेच आहे. कामत यांनी आपल्या पुढे कायम आदर्श ठेवला तो रा. चिं. ढेरे यांचा. दोघांचे नाते कुतूहल वाढवणारे आहे. याचा कोणीतरी शोध घ्यायलाच हवा.
अशोक कामत यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे दैनंदिनी लिहिण्याचा त्यांचा आग्रह. ते स्वत सत्तरएक वर्षे नियमितपणे डायरी लिहीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी संशोधन करणाऱयांना डायरी लिहिणे बंधनकारक होते. त्यांच्यापैकी कोणीही भेटायला आले की, तो पूर्वी केव्हा आला होता हे ते विचारत असत. कारण ते त्याच्याशी काय बोलले हे कामत यांनी लिहून ठेवलेले असायचे. याबाबत समाधानकारक उत्तर आले नाही की ते सांगत, ठरवले होते तसे करून या. त्याबाबत खुद्द अशोक कामत यांनी म्हटले आहे की, “अशा थोडय़ाशा कडक अनुशासनामुळेच माझ्या पन्नास विद्यार्थ्यांनी उच्च पदवीसाठी यशस्वीपणे कामे पूर्ण केली.” कामत मूळचे गोव्याचे, पण अनेक गावांत परिस्थितीवश राहिले तरी रुजले आणि वाढले ते पुण्यातच. त्यांनी म्हटले आहे की, “पुण्यात जो राहिला त्याला इतर कुठलंच गाव पुण्यापेक्षा चांगलं असं वाटत नसावं. माझं तरी तसं झालं बुवा!”
तर असा अष्टावधानी हा माणूस. संत नामदेव अध्यासनात जे काम ते करू शकले नाहीत ते त्यांनी गुरुकुलात सुरू केले. ते दीर्घकाळ कसे चालेल याची तजवीज करून ठेवली. तशी माणसे त्यांनी घेतली. त्याबाबत त्यांचे धोरण होते – दुश्मनी लाख सही, खत्म न कीजे रिश्ता, दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहिए. अशा या दुर्मिळ पंडिताला श्रद्धांजली.