सिनेमा – नात्याची अजोड गुंफण

>> प्रा. अनिल कवठेकर

बाप आणि मुलगा या दोघांच्या नात्यांमध्ये एक वेगळीच गुंफण असते. ती स्पष्ट जाणवणारी नाही. बरेचदा बापाचं वागणं विक्षिप्त वाटतं आणि त्यामुळे मुलाचं वागणं विक्षिप्त झालंय असं पाहणाऱ्यांना वाटतं. पण विचार केल्यानंतर बाप असा का वागतो याचं उत्तर मुलाला मिळू शकतं. प्रत्येक बापाला आपला मुलगा यशस्वी व्हावा असं वाटत असतं. बाप ज्या पद्धतीने आयुष्य जगलेला असतो, त्या आयुष्यातून त्याने जगण्याचं एक तंत्र प्राप्त केलेलं असतं. ते तंत्र योग्य आहे आणि तेच आपल्या मुलाने स्वीकारायला हवं असं बापाला वाटतं. आपला बाप जुन्या विचारांचा आहे, त्याला टेक्नॉलॉजीमधलं काही कळत नाही, असा मुलाचा गैरसमज असतो. यातून दोघांमध्ये तयार झालेला ताण म्हणजे `द मेहता बाईज’ हा चित्रपट.

बोमन इराणी निर्मित आणि दिग्दर्शित `द मेहेता बॉईज’ हा चित्रपट बोमन इराणीच्या अनेक चित्रपटांतील वेगवेगळ्या ढंगाच्या, रंगाच्या आणि लक्षात राहतील अशा भूमिका पाहिल्यानंतर त्यांच्यातला अभिनेता जेव्हा दिग्दर्शन करतो तेव्हा तो चित्रपट कसा असेल याची उत्सुकता होती. त्या उत्सुकतेच्या अपेक्षेला बऱयाच अंशी न्याय देणारा हा चित्रपट आहे. मेहता नावाचं गुजराती कुटुंब आहे. 71-72 वर्षांचे वडील (बोमन इराणी), अमेरिकेत राहणारी मुलगी अनू आणि मुलगा अमेय जो मुंबईत व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. मेहता यांची पत्नी नुकतीच मरण पावली आहे. पत्नीने केलेल्या ठरावाप्रमाणे दोघांपैकी एकजण आधी गेल्यावर मागे जो जिवंत राहील त्याने उरलेले आयुष्य मुलीबरोबर अमेरिकेत काढायचे आहे. त्यामुळे मनात नसताना मेहता मुलीसोबत अमेरिकेला जायला निघतात. मेहता तसा विक्षिप्त माणूस आहे. खेड्यातल्या एका मोठ्या, जुन्या व शांत घरात तो राहात असतो. लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतो. त्यांना कोचिंग करतो. एकेकाळी त्याची टायपिंग इन्स्टिट्यूट होती.

तो विल टाइप करत असताना खाली कॅब येते. त्या घराशी असलेली त्याची भावनिक ओढ तो ज्या पद्धतीने व्यक्त करतो ते खरंच सुंदर आहे. त्याच्याकरता ते घर नसून त्यांच्या आठवणींचं भावविश्व आहे. त्या भावविश्वात त्या जुन्या आठवणीसोबत त्याला राहायचं आहे. जगायचं आहे. त्याच्याकडे सुनील गावसकरची सही असलेली बॅट आहे. ती त्याला न्यायची आहे. त्याच्या फ्रेम्स, ग्रामोफोन न्यायचा आहे. ग्रामोफोन लावून दोघं नवराबायको नाचायचे त्या आठवणी त्यात बांधलेल्या आहेत. ज्या सोफ्यावर त्याची बायको मरण पावली तो सोफा न्यायचा आहे. इमोशनली एखादा माणूस घरातल्या छोटय़ा छोटय़ा वस्तूंबरोबर किती जोडला गेलेला असतो. माणूस मरण पावल्यावर त्याने स्पर्श केलेल्या वस्तूमधलं त्याचं अस्तित्व जाणवणारा आणि तसं मानणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा हा मेहता आहे. मेहताचं व त्याच्या मुलाचं अजिबात पटत नाही आणि विमानाचं तिकीट न मिळाल्यामुळे वडिलांना दोन दिवस सांभाळण्याची जबाबदारी मुलावर पडलेली असते. अनूला बापलेकाच्या नात्याची पूर्ण जाणीव असल्याने ती भावाला त्यांना सांभाळून घे, अशी विनंती करते.

मुलाच्या गाडी चालवण्यावर वडिलांचा अजिबात विश्वास नसतो. जिना चढताना त्यांच्या बागांना ते त्याला हात लावू देत नाहीत. स्वत ओढत घेऊन जातात. हा त्यांचा हट्टी स्वभाव मुलाला आवडत नसतो. पण दोन दिवस त्याला त्यांना सांभाळायचे आहे. अमेय वडिलांना स्वत:ची बेडरूम देतो. बेडरूममध्ये त्याची आई-बहीण आणि त्याचा फोटो असतो. बापाचा नसतो. यावरून त्या दोघांमध्ये पडलेलं अंतर लक्षात येतं. बापाचं आपल्या मुलाकडे खोचक पद्धतीने पाहणं सुरूच असतं.

मुलगा बेडवर काहीतरी करत असताना त्याच्या आाफिसच्या पेपर्सवर छताचं पाणी गळण्याआधीच वेगाने बाप तिथे भांडं ठेवतो आणि नुडल्स बनवायला जातो. महत्त्वाचे पेपर ओले होण्यापासून वाचतात. बाप विचारतो, `मी आता नुडल्स बनवणार आहे. तू खाणार का?’ मुलगा नाही सांगतो. तरी बाप आणून ठेवतो. टीव्ही लावून आरामात नुडल्स खातो. तो गेल्यावर मुलगाही बापासारखाच नुडल्स खात तोच कार्पाम पाहतो. दुसरीकडे छतातून ठिबकणाऱया पाण्याची बादली भरत आलेली असते. जणू काही बऱयाच वर्षांपासून दोघांच्या मनात एकमेकांविषयी साठलेल्या न्युनगंडाचं पाणी बाहेर पडत आहे आणि नातं मोकळं होत आहेत. त्या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वाद होत राहतात. आपल्या बाबांशी कसं वागावं हेच त्याला कळत नाही. कारण ते अवघड आहे. तो ज्या भिंतीला टेकून बसला आहे तिथला कलर उडालेला आहे. त्यावरून त्याच्या मनाचा गोंधळ स्पष्ट होतो.

अमेरिकेला जाणाऱया फ्लाईटला 16 तास बाकी असताना मेहता बॅग पॅकिंग करायला लागतो. मुलगा म्हणतो, एवढी घाई का? बाप म्हणतो, माणसाने कधीही तयार राहावं. शेवटच्या क्षणी धावाधाव करू नये. अप्रत्यक्षपणे तो हे शेवटच्या क्षणी तयारी करण्याची सवय असलेल्या आजच्या पिढीला, मुलाला शिकवत आहे. संपूर्ण चित्रपट हा केवळ बोमन इराणी यांच्याभोवती फिरतो आणि ते प्रत्येक दृश्यामध्ये भाव खाऊन जातात. बोमन इराणीचा एक वेगळा बाप पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. अभिनयाची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. मुलगा अमेयच्या भूमिकेत असलेल्या अविनाश तिवारीला कुठेही छाप पाडता आलेली नाही. भूमिका समजून घेण्याची त्याची क्षमता अजून तयार झालेली नाही. श्रेया चौधरीने बहीण झाराच्या भूमिकेत छान काम केलं आहे. एकंदर बाप-मुलाच्या नात्यातल्या गुंतागुंतीसोबत हा चित्रपट खूप काही सांगून जातो.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)