दारू प्यायलो नव्हतो, एअरबॅग उघडल्यामुळे मला काहीच दिसत नव्हते; वडोदऱ्यातील ‘त्या’ मुलाचा दावा

गुजरातमधील वडोदरा येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या करेलीबाग परिसरात एका मद्यधुंद चालकाने भरधाव कार चालवून तीन दुचाकीस्वार आणि रस्त्याने जाणाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रक्षित चौरसिया व प्रांशू चौहान या दोन तरुणांना अटक केली आहे. रक्षित हा गाडी चालवत होता व अपघात झाल्यानंतर तो गाडीतून उतरला व आणखी एक राऊंड म्हणत त्याने धिंगाणा घातला.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी रक्षितला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकीय चाचणीनंतरच त्याने दारू प्राशन केली होती का ते स्पष्ट होईल. मात्र रक्षितने चाचणीला नेत असताना प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये त्याने दारू प्यायली नसल्याचे म्हटले आहे.

”मी दारू प्यायलेलो नव्हतो. आम्ही होळीची पूजा करून आपल्या रूमवर जात होतो. माझी गाडी 50 किलोमीटर प्रती वेगाने जात होती. त्यावेळी रस्त्यावर आमच्या शेजारी एक बाईक होती. त्या बाईकला ओव्हर टेक करण्याचा मी प्रयत्न करत होतो त्याचवेळी तिथे एक मोठा खड्डा आला व खड्ड्यामुळे माझी गाडी बाईकला घासली गेली. बाईकचा धक्का बसल्यामुळे गाडीचे एअरबॅग्ज उघडले. त्यानंतर मला समोरचं काहीच दिसत नव्हतं”, असं रक्षितने सांगितलं.

रक्षित हा मूळचा उत्तर प्रदेशमधील वाराणसीचा रहिवासी असून तो वडोदऱ्यातील विद्यापीठाक कायद्याचे शिक्षण घेतोय. तर दुसरा आरोपी प्रांशू चौहान हा वडोदऱ्यातच राहत असून अपघातग्रस्त गाडी ही त्याच्या नावावर आहे.