
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाचे नाव हे अत्यंत विचारपूर्वक दिले आहे. त्याबाबत तत्कालीन विधिमंडळात झालेल्या निर्णयाचा प्रथम अभ्यास करावा, मगच नामविस्ताराबाबत बोलावे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहेत. ‘शिवाजी’ हा शब्द आमची अस्मिता आहे. या अस्मितेशी कोणी बाहेरून आलेल्यांनी खेळू नये; अन्यथा अशा प्रवृत्तींना ठोकून काढू,’ असा गर्भित इशारा येथील शिवप्रेमींकडून देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येत्या 17 मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनीही आज सायंकाळी चित्रदुर्ग मठात बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नामविस्ताराच्या मागणीला समर्थन देणारे चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि अशोक माने या आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला. बैठकीला ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंग पवार, डॉ. वसंत मोरे, डॉ. भालबा विभूते, विलास पोवार, वसंत मुळीक, आर. के. पोवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जयसिंग पवार म्हणाले, “शिवाजी’ हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दातच प्रचंड ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठाचे दिलेले नाव योग्य आहे. ते बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. जे बदलू इच्छितात, त्यांना या दिलेल्या नावामागचा इतिहास समजावून सांगू.’ डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठाला दिलेले नाव बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये; अन्यथा अशा प्रवृत्तींना ठोकून काढल्याशिवाय पर्याय नाही.’ डॉ. भालबा विभूते यांनी विद्यापीठाच्या नावासंदर्भात तत्कालीन मंत्रिमंडळात झालेल्या घटनांचा संदर्भ देत, ‘जर आता नावात बदल केला, तर या विद्यापीठाची मूळ ओळख पुसून जाईल. कोल्हापूरकरांनी असे असंख्य प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सोडवले आहेत. त्यामुळे नामविस्तार करण्याचा घाट थोपवण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमीने पुढे येण्याची गरज आहे.’ यावेळी सुरेश शिपूरकर यांनी त्यावेळी या विद्यापीठाला देण्यात आलेली बाराशे एकर जमीन ही सरकारी नसून, येथील नागरिकांनी दिली आहे. इतरांनी कोणीही जमीन दिली नसल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. रमेश पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माजी महापौर महादेव आडगुळे, व्ही. बी. पाटील, चंद्रकांत यादव, बबन रानगे, डी. जे. भास्कर, अॅड. विवेक घाडगे, उदय नारकर, बाबूराव कदम, शशिकांत पाटील, सरला पाटील, हर्षल सुर्वे, शैलजा भोसले, सुनीता पाटील, अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते.
नामविस्तारासाठी 17 मार्चला मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या ‘शिवाजी विद्यापीठा’चे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
…तेव्हा कुठे गेल्या होत्या संघटना ?
‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या जेम्स लेनचे उदात्तीकरण करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांचा या हिंदुत्ववादी संघटनांनी किती निषेध केला? यावेळी या संघटना कुठे लपून बसल्या होत्या?’ असे सवाल अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक व विलास पोवार यांनी यावेळी उपस्थित केले.