
पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात रंगपंचमी साजरी होत असतानाच दोन गटात तुफान राडा झाला. त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान दोन्ही बाजूच्या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी 17 मार्चपर्यंत बिरभूममधील पाच ग्रामपंचायतींची इंटरनेट सेवा बंद केली आहे.
बिरभूममधील सैनीथिया गावात दोन गटात बोलता बोलता अचानक वाद झाला. या दोन्ही गटातील काही लोकं दारू प्यायलेली होती. हा वाद इतका टोकाला गेला की दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही स्थानिक लोकं जखमी झाली.
या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या गृहमंत्रालयाने सैनिथिया व त्याच्या आसपासच्या पाच गावांची इंटरनेट सेवा बंद केली आहे. यात हाथोरा, माथपाल्सा, हारिसारा, फर्यिापूर व फुलूर गावांचे इंटरनेट 17 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.