
देशभरामध्ये शुक्रवारी धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली, तर दुसरीकडे रमजानच्या पवित्र महिन्यातील जुम्माची नमाजही पार पडली. एकीकडे हा उत्साह असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मात्र एक खळबळजनक घटना घडली. अलीगड येथे घराबाहेर सेहरीसाठी उभ्या मुस्लिम तरुणाला दुचाकीवर आलेल्या चार हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार मारले. हा सर्व प्रकार घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली असून गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे नाव हारिस उर्फ कट्टा असे आहे. हारिस अन्य एका व्यक्तीसोबत घराबाहेर उभा होता. तेवढ्यात दुचाकीवरून चेहऱ्याचा फडका बांधलेले हल्लेखोर येतात आणि एकामागोमाग एक गोळ्यांच्या फैरी हारिसवर झाडतात.
हारिस स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो सैरावैरा धावतो, पण एक गोळी त्याला लागते आणि तो जाग्यावर कोसळतो. याचवेळी दुचाकीवरील हल्लेखोर खाली उतरताना आणि हारिसवर जवळून गोळ्या झाडतात. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार होतात. हत्येचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हारिसला एकूण 7 गोळ्या लागल्या असून त्याचा जाग्यावरच मृत्यू होतो.
बाबा की पुलिस को चुनौती… pic.twitter.com/yRrlMm1NFf
— Jeet Govind Sarkar (@Jeetsarkar_) March 14, 2025
हारिसचे काका मोहम्मद खालिद यांनी सांगितले की, रमजानच्या निमित्त त्याने रोजा धरलेला होता आणि तो सेहरीसाठी घरी येत होता. त्याचवेळी त्याच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्याचे कारण स्पष्ट नाही. मात्र जुन्या वादातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.
सेहरी म्हणजे नेमके काय?
सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो. यावेळी सेहरी घेतली जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते.