माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा शिवसेनेने केला पंचनामा, सुभाष देसाई यांनी प्रशासनाचे उपटले कान

दक्षिण रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील नागरिकांसाठी माणगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंचनामा केला आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी अचानक या रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. यावेळी रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतानाच सोयीसुविधा पुरवण्यात चालढकल करणाऱ्या प्रशासनाचे त्यांनी कान उपटले. जोपर्यंत रुग्णांना सोयीसुविधा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना पाठपुरावा करून रुग्णांना न्याय मिळवून देईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

शंभर खाटांचे रुग्णालय असलेल्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, मॅमोग्राफीसारख्या अद्ययावत मशिनरी उपलब्ध आहेत. मात्र केवळ तज्ज्ञांची नेमणूक नसल्याने त्या धूळ खात पडल्या आहेत. लाखो रुपये खर्चुनही येथील यंत्रणा ठप्प असल्याने सोनोग्राफीसाठी गोरगरीबांना खासगी रुग्णालयात हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. रुग्णालयात पुरेसा औषधसाठा नसल्याने खासगी मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागतात. उपचारासाठी नाइलाजास्तव खासगी हॉस्पिटलची पायरी चढावी लागत असल्याच्या तक्रारी येताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन झाडाझडती घेतली.

आरोग्य विभागाला जाब विचारणार

मॅमोग्राफी मशिनरी आणली तेव्हा सरकारने गाजावाजा करत याचा शुभारंभ केला होता. मात्र आजतागायत तज्ज्ञ टेक्निशियन नेमणूक न केल्याने महिलांच्या स्तनावरील कर्करोगावर उपचार करणारी मशिनरी धूळ खात पडली आहे. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळेच ही भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून याचा जाब विचारला जाईल, असा इशारा सुभाष देसाई यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.