तलावांचे ठाणे बनले कचऱ्याच्या ढिगांचे ठाणे, राजन विचारे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

ऐतिहासिक ठाणे हे एकेकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे. हे तलावांचे ठाणे आता कचऱ्याचा ढिगांचे ठाणे बनले असून लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्याच मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता येत नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कच्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.

शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. पालिकेला स्वतः चे डम्पिंग ग्राऊंड नाही. याच ठाणे महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता. आता ठाणे शहर हे दुर्गंधीचे आगर बनत असल्यामुळे लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गेल्या तीन वर्षांपासून ठाणेकर विविध समस्यांना तोंड देत आहेत. रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या देखील अनेक समस्या असून कामे न करता ठेकेदारांची बिले काढली जात असल्याचा आरोपही विचारे यांनी केला.

ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा सचिव सुरेश मोहिते, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाढवे, समन्वयक संजय तरे, उपशहरप्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, प्रदीप वाघ, विभागप्रमुख प्रशांत सातपुते, लहू सावंत, संजय भोई, विनोद यादव, शाखाप्रमुख राजेंद्र महाडिक, अमोल हिंगे, रामेश्वर बचाटे, पप्पू आठवाल, युवासेना अधिकारी ओवळा – माजिवडा नटेश पाटील, सुनंदा देशपांडे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, शहर संघटक प्रमिला भांगे, महिला आघाडी सचिव शोभा गरंडे आदी उपस्थित होते.

शहरात गुन्हेगारी वाढली

ठाणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी पडत आहे. तरीदेखील मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मात्र सर्रासप्रमाणे सुरक्षा पुरवली जात असून कमी मनुष्यबळामुळेच ठाण्यात गुन्हेगारीचे प्रमाण फोफावले असल्याचा आरोप शिवसेनेच्या राजन विचारे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा जाब विचारला.