ग्राम्यसंस्कृती – ग्रामदेवतेचा उत्सव

>> जे. डी. पराडकर

कोकणातील शिमगोत्सव म्हणजे नितांत श्रद्धेवर आरुढ झालेल्या भक्तिमय वातावरणाचा एक अनोखा संगम. या उत्सवातील अशाच काही प्रथा, परंपरा…

कोकणात साजऱया करण्यात येणाऱया विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढं महत्त्व आहे, तेवढे खचितच अन्य सणांना असेल. शिमगोत्सव म्हणजे ग्रामदेवतेचा उत्सव! ग्रामदेवतेचा जयजयकार करताना शिमगोत्सवात प्रत्येक गावच्या प्रथा जरी वेगळ्या असल्या, तरी सर्वांचा उद्देश आपल्या ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे एवढाच असतो. शिमगा आणि मानपान यांचे खूप जुने आणि भावनिक नाते आहे. पूर्वापार चालत आलेल्या मानपानात बदल होत नाहीत. यामध्ये काही मागेपुढे झाले तर या उत्सवात गालबोट लागण्याचीही शक्यता असते. नेमून दिलेल्या जबाबदाऱया सुरळीत पार पाडल्या की, हा उत्सव उत्तरोत्तर रंगत जातो. कोकणच्या ग्रामीण भागात शिमगोत्सवाच्या आधी लग्न विधींचे मुहूर्त घेण्याची प्रथा असल्याने फाक पंचमीपासून गावागावातून उत्साहाचे वातावरण असते. नव्याने लग्न झालेले जोडपे होळीभोवती फिरून होमात श्रीफळ अर्पण करतात. असे श्रीफळ अर्पण केल्याशिवाय जणू लग्नविधी पूर्णत्वास जात नाही, अशी नितांत श्रद्धा यामागे असते. फाक पंचमीला सुरू झालेला ग्रामदेवतेचा हा उत्सव पुढे गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत अखंडपणे सुरू असतो.

गावाची वेस बदलली की, शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा बदलते. रत्नागिरी जिह्याच्या विविध भागांतील शिमगोत्सवाच्या आगळ्यावेगळ्या प्रथा अक्षरश अचंबित करणाऱया आहेत. भक्तगणांनी अज्ञातस्थळी जमिनीखाली पुरून ठेवलेल्या खुणा पालखी शोधून दाखवते. हा सोहळा म्हणजे नितांत श्रद्धेवर आरुढ झालेल्या भक्तिमय वातावरणाचा एक अनोखा संगम असतो. जमिनीत पुरून ठेवलेल्या खुणेजवळ पालखी आली की, ती एवढी जड होते की खुणेजवळ पालखीचा खूर आपोआप आपटतो. त्या ठिकाणी खणल्यावर लपविलेली खूण सापडली की, उपस्थित हजारो भक्तगणांकडून ग्रामदेवतेच्या नावाचा एकच जयजयकार केला जातो. चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात साजरा होणारा होल्टे होम हा एक असाच चकित करणारा शिमगोत्सवातील प्रकार आहे. होम पेटविण्याच्या दरम्यान एकमेकांवर पेटती लाकडे फेकून मारली जातात. विशेष म्हणजे या प्रकारात कोणाला काही इजा होत नाही. संगमेश्वर तालुक्यातील कडवई घोसाळकर कोंड येथे होळीचा माड उभा करताना त्याला हात न लावण्याची प्रथा आहे. जमिनीवर आडवा असणारा हा माड शेकडो भक्तगण काठीच्या सहाय्याने उचलतात आणि मोठय़ा कल्पकतेने काठय़ांचा आधार देतच उभा करतात.

गावच्या ग्रामदेवता मंदिराजवळ गावची सहाण असते. याच ठिकाणी रूप लागलेल्या ग्रामदेवतेच्या मूर्ती पालखीत विराजमान झालेल्या असतात. कोकणात दोन प्रकारचे शिमगोत्सव साजरे होतात. त्रयोदशीच्या शिमग्यांना तेरसे, तर पौर्णिमेच्या शिमग्यांना भद्रेचे शिमगे असे म्हटले जाते. बहुसंख्य गावातून सहाणेजवळ उभा करायचा माड म्हणून आंब्याचे मध्यम आकाराचे झाड निवडले जाते, तर काही गावांतून सुरमाड किंवा पोफळ उभी करण्याची परंपरा आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द गावात पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ चांदण्यात संपन्न होणारा शिमगोत्सव सोहळा दृष्ट लागण्यासारखा असतो. हा संपूर्ण सोहळा अन्य कोणत्याही प्रकाशाविना केवळ चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशात संपन्न होतो. संगमेश्वरनजीकच्या करंबेळे गावात संपन्न होणारा शिमगोत्सव म्हणजे शिवने आणि करंबेळे येथील दोन पालख्यांची गळाभेट असते. संगमेश्वरजवळील वांद्री गावात पालख्यांची भेट नदीपात्राच्या मध्यभागी होते. हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.

ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे, पालखी आपल्या घरामध्ये घेऊन देवीची ओटी भरणे आणि सालाबादच्या रखवालीचा नारळ अर्पण करणे हा एकमेव भक्तिमय उद्देश यामागे प्रत्येकाचा असतो. शिमगोत्सवात नमनखेळे, गोमू, संकासूर अशा विविध नृत्य प्रकारांचीही रेलचेल असते. पालखी आधी किंवा नंतर खेळे, संकासुर घरोघरी फिरून पोस्त घेतात. शिमगोत्सवाच्या दिवशी प्रत्येक जण मनसोक्त पालखी नाचवतो आणि ढोलवादनाचा आनंदही लुटतो. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पालखी प्रत्येक भक्तगणाच्या घरी नेली जाते. वर्षभरात एक दिवस प्रत्यक्ष ग्रामदेवता घरी येण्याचा दिवस भक्तासाठी आनंददायी असतो. अखेरच्या दिवशी रंगांची उधळण करीत रात्रभर पालखी नाचवून रूपे उतरवली जातात. ग्रामदेवतेसमोर नमन या सांस्कृतिक कलेचे सादरीकरण झाल्यावर शिमगोत्सवाची सांगता होते. मोठय़ा आर्थिक उलाढालीसह सर्वांना एकत्र आणणारा तसेच भक्तिमय वातावरणात साजरा होणारा ग्रामदेवतेचा उत्सव महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.

ग्रामदेवतेला चांदीचे मुखवटे चढविल्यानंतर ही रूपे उतरवेपर्यंत 15 दिवस ते एक महिन्याचा कालावधी जातो. पालखीचा सर्व प्रवास पूर्ण होईपर्यंत रोजचा मुक्काम, मानाचे खेळ आदी कार्पाम दरवर्षी ठरल्याप्रमाणे पार पडतात. घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या ग्रामदैवतांचे दर्शन व्हावे यासाठी कोकणात शिमगोत्सवात घरोघरी फिरवल्या जाणाऱया पालखीची प्रथा अन्यत्र क्वचितच आढळेल. बदलत्या काळात आता कोकणच्या विविध भागांत पालखी नृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाऊ लागल्याने पालखी या विषयाचे महत्त्व वाढू लागले असून पुरातन काळापासून सुरू असलेली ही प्रथा-परंपरा काही स्वागतार्ह बदल करून नवीन पिढीही अंगीकारते आहे. शिमगोत्सवादरम्यान सर्वाधिक ताण मानकरी, गावकरी आणि पोलीस यंत्रणेवर असतो. गावातील सर्व घरांमधून पालखी येऊन गेली की, अखेरच्या दिवशी रात्रभर ती सहाणेवर नाचवली जाते. यालाच शिंपणे असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी रूपे उतरवली गेली की, शिमगोत्सवाची सांगता होते आणि चर्चा सुरू होते ती ग्रामदेवतेचा कौल घेऊन करावयाच्या पारधीची. कोकणातील सर्व गावांतून गुढीपाडव्याच्या दिवशी होळी पौर्णिमेला उभारलेल्या माडाची विधिवत पूजा करून तो तोडण्याची प्रथा आहे.