
14 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून माणगावमध्ये हजारो चाकरमान्यांनी जोरदार आंदोलन केले. होळी रे होळी.. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांची ‘होळी’.. आता आश्वासने बस्स झाली.. लटकलेले काम पूर्ण करा.. अशा जोरदार घोषणा देत जनआक्रोश समिती आणि प्रवाशांनी सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिमगा केला. गतिमान सरकार अशी टिमकी वाजवणाऱ्या खोके सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
2011 मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र महामार्गावरील ठिकठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पूल, मोऱ्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गावर मागील 14 वर्षांत 5 हजार 61 अपघात झाले असून त्यामध्ये 1 हजार 229 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. या ढिसाळ कारभाराविरोधात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जिल्हा महिला संघटक स्विटी गिरासे, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, महाड विधानसभा क्षेत्रप्रमुख जनार्दन मानकर, आनंद पवार, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, योगिता मोरे, आशीष फळसकर, शहरप्रमुख अजित तारळेकर, विशाल सायकर, सुधीर सोनावणे, अजिंक्य मोरे, डॉ. परेश उभारे, भाई येलमकर, कौस्तुभ करडे, योगेश गायकर, निकेश कोसबे, प्रभाकर ढेपे तसेच मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे अजय यादव, सुरेंद्र पवार यांच्यासह शिवसैनिक, चाकरमानी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
तटकरे, गोगावलेंना कोकणात फिरू देणार नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड तसेच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना नागेंद्र राठोड यांनी सरकारवर जोरदार टीका केली. खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे तसेच भरत गोगावले हे स्वतःला कोकणचे स्वयंभू नेते समजतात. मात्र त्यांनी या महामार्गाच्या लटकलेल्या कामाकडे लक्ष न दिल्यास त्यांना कोकणात फिरू देणार नाही असा इशाराही नागेंद्र राठोड यांनी दिला.