वेबसीरिज – सुरांसोबतचे भावनिक युद्ध

>> तरंग वैद्य

शुद्ध संगीत हा विषय घेऊन आलेली ‘बंदिश बैंडीट’ ही वेबसीरिज. शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीत मिळून एक वेगळं कर्णमधुर ‘फ्युजन’ ही बनवता येतं आणि लोकप्रियही होतं हे दर्शवणाऱ्या या सीरीजचा पुढचा भाग लोकप्रिय ठरत आहे.

हिंदी सिनेमा काय, भारतीय सिनेमा गाण्यांशिवाय अपुरा वाटतो.  मात्र संगीत ह्या विषयावर आधारित खूपच कमी चित्रपट आले. 2020 साली शुद्ध संगीत हा विषय घेऊन `बंदिश बैंडीट’ ही वेबसीरिज आली आणि लोकांनी उचलून धरली. ह्या मालिकेत राजस्थान येथील शास्त्राrय संगीताचे उपासक राठोड घराण्याची कथा, गुरू आणि त्यांनी बांधलेल्या गंडय़ाचे महत्त्व, नियमित रियाज आणि समर्पणाबद्दल भाष्य केले होते, तसेच शास्त्राrय संगीत आणि आधुनिक संगीत मिळून एक वेगळं कर्णमधुर `फ्युजन’ ही बनवता येते आणि लोकप्रियही होते हे दाखवले होते.

लोकप्रिय झालेल्या सगळ्या मालिकांचा `सीजन-2′ येतो त्याप्रमाणे `बंदिश बैंडीट’च्या सीजन 2 आला आहे. पहिल्या भागात शास्त्राrय आणि आजच्या संगीताचे मिलन दाखवून झाले होते. त्यामुळे ह्या भागात असे काही दाखवणे गरजेचे होते, ज्यामुळे शास्त्राrय संगीतही लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच आधुनिक आणि रॉक, जॅझसारखे संगीत ऐकणारेही हे संगीत युद्ध आवर्जून ऐकतील/बघतील. युरोपियन बँड स्पर्धेच्या धर्तीवर भारतात `इंडियन बँड कॉम्पिटिशन (घ् ँ ण्) आयोजित केली जाते आणि मग एक संगीत महोत्सव सुरू होतो. मागच्या भागात आपण बघितले होते की, राधेचा अल्बम लोकप्रिय झाला असूनही आपले आजोबा आणि गुरूंची आज्ञा मानून तो घरी परत येतो आणि आपल्या घराण्याचे संगीत पुढे नेण्यासाठी सज्ज होतो. तमन्ना, जिच्या सोबत राधेचा अल्बम गाजला असतो, तिला समजते की संगीत नुसते वरवरचे नसून त्यात शिकण्यासारखे खूप काही आहे. `सीजन 2’मध्ये तमन्ना कसौली येथील संगीत महाविद्यालयात संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी अॅडमिशन घेते. पुढे तिच्या कॉलेजचा बँड तसेच राधे राठोड आणि परिवार घ् ँ ण् स्पर्धेत एकमेकांसमोर येतात आणि संगीतासोबत एक भावनिक युद्धही  सुरू होते.

अभिनयाबद्दल बोलायचे तर राधे (रित्विक भौमिक), तमन्ना (श्रेया चौधरी) ही मुख्य पात्रे, मागच्या भागाप्रमाणे ह्या भागातही दोघे आपली बाजू नीट सांभाळून आहेत. शिबा चा, अतुल कुलकर्णीही अप्रतिम. राधेच्या काकाच्या भूमिकेत अमित मिस्त्राr होते, पण त्यांच्या अकाली निधनामुळे ह्या भागात त्यांची भूमिका सौरभ नय्यर यांनी योग्यरीत्या निभावली आहे. ह्या भागात नवीन `एन्ट्री’ म्हणजे संगीत शिक्षिकेच्या भूमिकेत दिव्या दत्ता, जिने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. अर्जुन रामपाल छोटय़ाशा भूमिकेत आवडून जातो. आजचा संगीतकार आणि आजच्या पिढीचे विचार ठामपणे मांडणारा परेश पाहुजा मनाला भिडतो. कुणाल रॉय कपूर ठीक. तमन्नाच्या वडिलांच्या भूमिका निभावणारे रितुराज सिंग आता आपल्यात नाहीत, त्यांना श्रद्धांजली. अभिनय आणि संगीताच्या ह्या जुगलबंदीत एक कलाकार असा आहे ज्याला आपण कायम दीन, परिस्थितीने लाचार अशा भूमिकेत पाहिला आहे, ह्या मालिकेतही त्याच्या वाटय़ाला तशीच भूमिका आली आहे. पण पुढे व्यसन सोडून मुलाला साथ देणारा बाप त्यांनी उत्तम उभा केला आहे. त्याला बासरी वाजवता येते की नाही हे माहीत नाही, पण बासरीवादक म्हणून तो खरा वाटतो. स्पर्धेत रॉक ह्या संगीत प्रकारात त्यानी अशी प्रस्तुती दिली आहे की, आपण आनंदाने अचंबित होतो. राजेश तेलंग हे ह्या अभिनेत्याचे नाव आणि त्याला सलाम.

संगीताला भाषेचे बंधन कसे नाही हे ह्या मालिकेतून समजते. संगीतातही गणित असते हेही कळते आणि संगीताचे सर्वच प्रकार श्रेष्ठ असून कोणी लहान मोठा नाही ह्याचेही ज्ञान होते. संगीतप्रकारांची तुलना करायची नाही. फक्त मनसोक्त आनंद घायचा हे उमगले तर संगीत आणखी गोड वाटू लागते. स्पर्धेत भाग घ्यायचा ह्या राधेच्या निर्णयावरून विखुरलेला राठोड परिवार जसजशी स्पर्धा पुढे जाते तसतसा एकत्र येऊ लागतो आणि प्रेक्षकही राधेची बाजू बळकट होत आहे हे बघून आनंदित होतात. अंतिम फेरीच्या अगोदर इतकी वर्षे परिवारापासून दूर असलेला पंडितजींचा सावत्र मुलगा सगळे विसरून घराण्यासोबत येतो आणि राठोड आपली लढाई जिंकतात. आता स्पर्धा म्हटले की जिंकणारा विजेताही हवाच ना. इथेही शेवटच्या भागात अंतिम स्पर्धा आणि विजेता घोषित केला जातो. अंतिम फेरीतील पाचपैकी स्पर्धा कोण जिंकते हे इथे सांगणे योग्य वाटत नाही. त्यासाठी `बंदिश बैंडीट सीजन 2′ बघा आणि आशा करूया की, ह्या मालिकेचा सीजन 3 लवकर येईल.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)