
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलने राबवलेल्या अभिनव उपक्रमाची दखल ‘इंडिया बुक रेकॉर्ड’ने घेतली आहे. नुकतेच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’’ने शाळेच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून चिकित्सक समूह शिरोळकरचे सचिव डॉ. गुरुनाथ पंडित यांनी हा दिवस सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेत एका मागोमाग एक सर्व कालखंडातील गाणे जसे अभंग, भारूड, गण, गवळण, लावणी, पोवाडा, नाटय़गीते, चित्रपट गीते, बालगीते इत्यादी सादर करण्याची संकल्पना मांडली. चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.
मराठी भाषा गौरव दिनाचा एक भाग म्हणून शाळेमध्ये पुस्तकांचे गाव तयार केले आहे. तसेच मुलींचे बॅण्ड पथक, लेझीम खेळणाऱया विद्यार्थ्यांचा चमू व महाराष्ट्रातील 36 जिह्यांची नावे व त्यांच्या बोलीभाषांचे नाव असलेले फलक व पेहराव असलेल्या विद्यार्थिनींनी गिरगावच्या प्रमुख रस्त्यांवरून संचलन केले. संपूर्ण गिरगाव परिसरात हा आकर्षणाचा विषय ठरला होता.