
जे काम करण्यासारखे आहे ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. आपण प्राधान्य कशाला द्यायचे ते ठरवा व वेळेचे योग्य व्यवस्थापन करा असा मूलमंत्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी महिलावर्गाला दिला.
सोनल खानोलकर आणि ‘निनाद प्रकाशन’ आयोजित ‘जाणीव उद्याची, स्त्री मनाची’ या महिला दिन विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ‘मनातली जाणीव’ दिवाळी अंकातर्फे रविवारी दादरच्या श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे हा विनामूल्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तन्वी हर्बल्सच्या संचालिका डॉ. ऋचा मेहंदळे-पै, अभिनेत्री आदिती सारंगधर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रंजीता पाटील, ‘डिजिटल डिटॉक्स डे’च्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी उपस्थित होत्या. विजया कदम-पालव यांच्या लावणीने आणि ठाण्यातील संकल्प शाळेमधील पालकांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
एलआयसीमधील मॅनेजर संध्या तांबट, स्पॅरो ताई फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. ज्योती परब, चैतन्य हॉटेलच्या संचालक डॉ. सुरेखा वाळके, छोटी गिर्यारोहक ग्रिहीथा विचारे, भावना मोटर्स संस्थापक अपर्णा शाह, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विजया दिवेकर, रांगोळी कलाकार मीरा निंबाळकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.