
नामदेव ढसाळ यांच्यावरील ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला परवानगी नाकारणाऱया सेन्सॉर बोर्डाचा निषेध म्हणून नुकताच गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृहात ‘कोण नामदेव ढसाळ’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नामदेव ढसाळांच्या कवितांचे वाचनही यावेळी मान्यवरांकडून करण्यात आले.
कविता वाचनासाठी नीरजा, प्रज्ञा दया पवार, संभाजी भगत, अभिनेत्री चिन्मयी सुमित, दीपक राजाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमावेळी नामदेव ढसाळ यांची मुलाखत आणि भाषणही दाखवण्यात आले. मुख्य म्हणजे नामदेव ढसाळांच्या आठवणी सांगतानाच सेन्सॉर बोर्डाला ‘तुही यत्ता कंची’ असा परखड सवालही यावेळी करण्यात आला. बंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्यावर आधारीत चित्रपट ‘चल हल्ला बोल’ सध्या सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे.सेन्सॉर बोर्डाने यातील शिवराळ भाषेवर आणि कवितांवर आक्षेप घेत ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा प्रश्नही विचारला होता. सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱयाच्या वक्तव्यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेकडूनही संताप व्यक्त होत आहे.