
मुंबईसह संपूर्ण राज्यभारत होळी आणि रंगपंचमीचा सण मोठय़ा उदंड उत्साहात साजरा झाला. अनेक दिग्गज कलाकार आणि आबालवृद्धांनी होळीदहन करून राज्यात सुखसमृद्धी नांदू दे यासाठी प्रार्थना केली. गिरगावपासून थेट इंडिया गेटपर्यंत सरकारच्या निर्देशांचे पालन करत रंगपंचमी उत्सव साजरी केली.
मुंबईकरांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनावर भर देत दिला. गल्लोगल्ली उभारण्यात आलेल्या होळीसाठी झाडे न तोडता, रस्ता न उखडता विधिवत पूजा करून होळीचे दहन करण्यात आले. मुंबईतील मराठी आणि हिंदी सेलेब्रेटींनीही आपापल्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसह धुळवड साजरी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरू होती. दरम्यान, दुपारी रंगाने माखलेल्या मुंबईकरांनी चौपाटय़ांवर धाव घेत पाण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
कोळीवाडे उजळले
कुलाबा, वरळी, माहीम, वेसावे, खारदांडा यासारख्या कोळीवाडय़ात पारंपरिक नृत्य करत मोठय़ा उत्साहात एक दिवस आधीच होळी साजरी करण्यात आली. होळीनिमित्त कुप्रथा आणि नकारात्मक गोष्टींचा नाश होवो आणि समुद्रात भरपूर मासळी मिळो, अशी प्रार्थना करत हाऊलूबाईचे दहन करण्यात आले.
राज्यात रंगांची उधळण
राज्याच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर नृत्याचा ठेका धरत होळीचे दहन करत रंगांची उधळण करण्यात आली. कोकणातही होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. होळीसाठी नवसाचे झाड तोडत नाचत-गाजत होळीचे दहन करण्यात आले. दुसऱया दिवशी कोकणी माणसांबरोबर बाहेरून आलेल्या पर्यटकांनी किनारे भरून गेले होते.
नियम मोडणाऱ्या 17 हजार जणांवर पोलिसांकडून कारवाई
सणाचा आनंद घेताना नियमांचे पालन करा. रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन होऊनही काही अतिउत्साही लोकांनी नियम धाब्यावर मारण्याचा प्रयत्न केला. पण अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठिकठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱयांना वेळीच अडवून कायदेशीर कारवाई केली. होळी व धुळवड अशा दोन्ही दिवशी वाहतूक पोलिसांनी तब्बल 17 हजार 495 चलानच्या कारवाया केल्या. विशेष म्हणजे, यावेळी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केवळ 183 कारवाया झाल्या. या नाकाबंदीत नशापान पिंवा मद्य पिऊन दुचाकी, चारचाकी वाहने चालवून नियम मोडणाऱया तब्बल 776 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 274 ट्रिपल सीट, 413 हेल्मेट नसणे तर 89 जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुंबईत सुमारे 80 जणांना घातक रंगाचा त्रास झाला.