तेलगूंनाही ‘छावा’ची भुरळ; आठवडाभरात ‘छावा’ने जमवला 12 कोटींचा गल्ला

‘छावा’ चित्रपट तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आणि तेलगू भाषिकांच्या मनाचाही ‘छावा’ने ठाव घेतला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ तेलगू भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने चांगलीच मुसंडी मारली आहे. तेलगू रसिक प्रेक्षकांनी कायमच चांगल्या कलाकृतींना मनमुराद दाद दिलेली आहे. हेच ‘छावा’ या चित्रपटाबाबत लागू पडलेले आहे. ‘छावा’ची तिकीटबारीवरील जोरदार बॅटिंग चालल्यामुळे तेलगू प्रेक्षकांनी चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा ‘छावा’लाच जास्त पसंती दिली. ट्रॉफी भारताने स्वतःकडे खेचून आणली त्या दिवशी तेलगू चित्रपटगृहांमध्ये क्रिकेटपेक्षा प्रेक्षकांनी ‘छावा’ला पसंती देत थिएटर्सही हाऊस फुल्ल केली होती. त्यामुळेच अवघ्या आठवडाभरातच ‘छावा’ने भाषेची सर्व बंधनं झुगारत तेलगू भाषेतही छप्परफाड कमाई करत तब्बल 12 कोटींचा गल्ला जमवला.