
कर्जबाजारी झाल्याने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. आता तर शेतीला पाणीही मिळत नाही अशी अन्नदात्याची अवस्था आहे. बुलढाण्यात एका बळीराजाने पाण्यासाठी आपले बलिदान दिले. कैसाल नागरे या तरुण शेतकऱयाने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्र्यांना चार पानी पत्र लिहिले. शेतीला पाणी द्या, कास्तराकाला वाचवा असा टाहोही त्याने पत्रातून पह्डला आहे.
कैसाल अर्जुनराव नागरे हे बुलढाण्याच्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी त्यांनी लढा उभारला होता. गेल्या डिसेंबरमध्ये एक आठवडा अन्नत्याग आंदोलनही केले होते. त्यावेळी सरकारने पाणी दिले जाईल असा शब्द दिला होता, परंतु तो पाळला नाही. त्यामुळे नागरे हे प्रचंड अस्वस्थ होते.
26 जानेवारी रोजी नागरे यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांनी उपोषण स्थगित केले. मात्र दोन महिने उलटले तरी ते आश्वासन पूर्ण झाले नाही. आपला पालकच फसवतोय या विचाराने ते दुःखी झाले होते. 13 मार्च रोजी होळीच्या दिवशी नागरे यांनी विष पिऊन आत्महत्या केली.
…तर शेतकरी भरकटणार नाही
आमच्या पंचक्रोशीत जर बारमाही पाणी आले तर शेतकरी भरकटणार नाही. सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, फक्त शेतीला पाणी हमी नाही, म्हणून उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही, शेतकऱयाचा आर्थिक समतोल बिघडतो आणि तो कर्जबाजारी होतो अन् वैफल्यग्रस्त होतो. घरगाडा, शेतीचा गाडा, कोर्टकचेरी, मुलांचे शिक्षण, सुखदुःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, अशा वेदना कैसाल नागरे यांनी पत्रातून मांडल्या.
हा सरकारी बळी ः काँग्रेस
कैसाल नागरे यांची आत्महत्या नव्हे, तर हा सरकारी बळी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती तसेच पंत्राटदारांचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ग्रामस्थ आक्रमक, गावात पोलीस बंदोबस्त
कैसाल नागरे यांच्या आत्महत्येमुळे शिवनी आरमाळ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. नागरे यांच्या मागणीसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे प्रशासन हादरले. गावामध्ये पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना चार पानी पत्र
मी स्वतः शून्य झालो, मागेही शून्य सोडून चाललो, मुलं, बाबा, बहिणी, भाऊजी, बायको यांनाही शून्य करूनच जातोय. माझ्या बाबांच्या भाषेत हे प्रारब्धाचे भोग आहेत, ते सर्वांनाच भोगावे लागणार. माझ्यावर केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा; राख आनंदस्वामी धरणात टाका; रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे. शेतीचे वादही गावकऱ्यांनी आपसात बसून सोडवावेत, असे कैसाल नागरे यांनी चार पानी पत्रात नमूद केले आहे.