
अभिनेत्री भाग्यश्रीला गंभीर दुखापत
बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीला ऐन होळीच्या आधी गंभीर दुखापत झाली असून कपाळावर तब्बल 13 टाके पडले आहेत. एका खेळादरम्यान पडल्याने तिला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कपाळावर गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांमुळे शेअर बाजार बेजार!
विदेशी गुंतवणूकदारांचा भरोसा हिंदुस्थानी शेअर बाजारावरून उठल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत चालला असून याला विदेशी गुंतवणूकदार जबाबदार आहेत. 13 जानेवारीला विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 792 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. शुक्रवारी धुलीवंदन सणामुळे शेअर बाजार बंद होता.
‘हल्दीराम’ने 10 टक्के भागीदारी विकली
स्नॅक्स आणि भुजिया बनवणारी कंपनी ‘हल्दीराम’ने त्यांच्या स्नॅक्स व्यवसायातील 10 टक्के हिस्सा विकला. सिंगापूरच्या ‘टेमसेक’ कंपनीने हा हिस्सा खरेदी केला आहे. हा करार 10 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर म्हणजे साधारण 8700 कोटी रुपयांचा झाल्याचे समजते. प्रमोटर अग्रवाल कुटुंब आणखी 5 टक्के हिस्सा विकणार असल्याचे समजते.
आमीर खान गौरीच्या प्रेमात पडला
अभिनेता आमीर खानने बर्थडे पार्टीमध्ये नव्या रिलेशनशिपची कबुली दिली. गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचे आमीरने सांगितले. गौरीला 25 वर्षांपासून ओळखत असून गेल्या दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे आमिर म्हणाला. गौरी स्प्रॅट ही बंगळुरूची असून ती आमीर खानच्या प्रोडक्शन
बॅनरखाली काम करते.
83 हजारांहून अधिक व्हॉट्सऍप अकाऊंट बंद
देशात डिजिटल अरेस्टच्या वाढत्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. ज्या नंबरचा डिजिटल अरेस्टसाठी वापर करण्यात आला अशा 83 हजारांहून अधिक व्हॉट्सऍप अकाऊंटला बंद करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री संजय बंदी कुमार यांनी दिली आहे.
इस्रोने दहा वर्षांत कमावले 12 अब्ज
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्त्राsने मागील 10 वर्षांत अन्य देशांचे सॅटेलाईट लाँच करून तब्बल 12 अब्ज रुपये कमावले आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली. इस्त्रोने जानेवारी 2015 ते डिसेंबर 2024 दरम्यान 393 विदेशी उपग्रह आणि तीन हिंदुस्थानी ग्राहक उपग्रह लाँच केले.