
उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने आग्रा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीतून फिरोजाबादच्या रवींद्र कुमार आणि त्याच्या एका सहकाऱ्याला अटक केली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला गुप्त लष्करी माहिती आणि वैज्ञानिक माहिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयएसआयच्या महिला एजंटने रवींद्र कुमारशी सोशल मीडियावर मैत्री केली आणि त्याला हनीट्रपमध्ये अडकवले. त्यानंतर ती त्याच्याकडून संवेदनशील माहिती जमा करू लागली. उत्तर प्रदेश एटीएसने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून रवींद्रकडून देशातील आयएसआयच्या नेटवर्कचा शोध घेण्यात येत आहे. एटीएसच्या तपासात असं दिसून आलंय की, रवींद्र कुमारला आयएसआय महिला एजंटने नेहा शर्मा नावाने बनावट अकाऊंट बनवून जाळ्यात ओढले. दोघांमध्ये नंबर एक्स्चेंज झाले. त्यानंतर व्हॉट्सऍपवर चॅट, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही झाले. पैशाचे आमिष दाखवून रवींद्र कडून सीक्रेट माहिती काढून घेतली. रवींद्रनेही आयएसआयला एजंटला ऑर्डिनन्स फॅक्टरीतील निगडित अनेक गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानला पाठवली. ऑर्डिनन्स फॅक्टरीचा डेली प्रोडक्शन रिपोर्ट तसेच स्क्रीनिंग कमिटीची काही कागदपत्रे आहेत.
एवढेच नव्हे तर, गगनयान प्रोजेक्टबद्दलची माहितीही त्याने लीक केली. यूपी एटीएसने रवींद्रचा मोबाईल तपासला असता त्यात सैन्य आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीतील काही गोपनीय कागदपत्रे सापडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसने सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. रवींद्र आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. तपासावेळी बरेच महत्त्वाचे खुलासे समोर आलेत. देशातील पाकिस्तानी आयएसआयचा नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकतो.