मास्तर, असं का केलं हो… विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा न झाल्याने मुख्याध्यापकांनी स्वतःलाच दिली शिक्षा!

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी चांगले शिकावे, आई-वडिलांचे, शाळेचे आणि गावचे नाव रोशन करावे, असे सगळ्यांना वाटते. परंतु विद्यार्थ्यांना चांगले शिकवूनही विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होत नाही, हे पाहून आंध्र प्रदेशातील एका मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याऐवजी स्वतःलाच शिक्षा दिली. तीसुद्धा विद्यार्थ्यांसमोर! ही घटना आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्हा परिषद शाळेत घडली. मुख्याध्यापक चिंता रमण यांनी विद्यार्थ्यांच्या खराब कामगिरीला कंटाळून हे पाऊल उचलले. मुलाला शिकवण्यात आम्हीच कुठे तरी कमी पडत आहोत, असे सांगत या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर उठाबशा काढल्या. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही, असे सांगत त्यांनी स्वतःला दोषी ठरवले. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसमोर कानाला पकडून 50 उठाबशा काढल्या. मुख्याध्यापक ज्यावेळी उठाबशा काढत होते त्यावेळी विद्यार्थी एकमेकांकडे पाहत होते. काही विद्यार्थ्यांनी मास्तर असे करू नका, अशी विनंतीसुद्धा मुख्याध्यापकांना केली. परंतु मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उठाबशा काढणे सुरूच ठेवले. मुख्याध्यापकांच्या या कृतीने उपस्थित असलेले शेकडो विद्यार्थी अक्षरशः
खजील झाले.

मुख्याध्यापकाने केलेल्या कृतीचे राज्यमंत्री नारा लोकेश यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शिक्षा देता मुख्याध्यापकांनी निवडलेला मार्ग हा चांगला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी मुख्याध्यापकांचे कौतुक केले आहे.