
पार्किंगच्या वादातून मोहाली येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयआयएसईआर) येथे काम करणाऱ्या 39 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. डॉ. अभिषेक स्वर्णकार असे त्यांचे नाव असून ते मोहालीतील सेक्टर 67 येथे भाडय़ाने राहात होते. शेजाऱ्यासोबत झालेल्या पार्किंगच्या वादातून मारहाण होऊन डॉ. स्वर्णकार यांना जीव गमवावा लागला. काही महिन्यांपूर्वी बहिणीने किडनी देऊन त्यांना जीवनदान दिले होते. ‘हुशार, प्रतिभावंत शास्त्रज्ञ गमावला असून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे,’ असे आयआयएसईआरने आपल्या निवेदनात म्हटले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. पार्किंगवरून डॉ. स्वर्णकार यांचा शेजारी माँटीसोबत वाद झाला. माँटीने डॉ. स्वर्णकार यांना मारहाण करून जमिनीवर ढकलले व ठोसा लगावला. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मूळ झारखंडमधील धनबाद येथील रहिवासी असलेले डॉ. अभिषेक स्वर्णकार हे एक प्रतिष्ठत शास्त्रज्ञ होते. याआधी ते स्वित्झर्लंडमध्ये काम करत होते आणि अलीकडेच ते मायदेशी परतले होते. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. आयआयएसईआरमध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून ते काम करत होते. अलीकडेच नोबल पुरस्कार विजेत्यांची भेट घेण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. डॉ. स्वर्णकार यांचे नुकतेच मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते.
नेमके काय घडले?
डॉ. स्वर्णकार हे त्यांच्या पालकांसोबत मोहालीच्या सेक्टर 67 मध्ये राहात. मंगळवारची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात असे दिसतंय की, पार्किंगमध्ये डॉक्टरांच्या बाईकजवळ स्थानिक लोक उभे आहेत. आरोपी माँटीही तिथे होता. डॉ. स्वर्णकार स्वतःच्या दुचाकीजवळ गेले आणि त्यांनी ती हटवली. इतक्यात वाद झाला आणि माँटीने डॉ. स्वर्णकार यांना जमिनीवर ढकलले आणि त्यांना मारायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप केला आणि माँटीला दूर ढकललं. आजूबाजूचे शेजारी जमा होण्यापूर्वी डॉ. स्वर्णकार जमिनीवर निपचीत पडलेले दिसतात.