अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात माथेफिरूने भाविकांवर लोखंडी रोडने केला हल्ला, 5 जण जखमी

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात भाविकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीने लोखंडी रोडने भाविकांवर हल्ला केला, त्यात 5 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखले आणि हल्लेखोराला अटक केली. आरोपीचे नाव जुल्फान, असं आहे. तो हरियाणाचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरोपीने भाविकांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीसोबत रेकी केल्याचा आरोप आहे.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन मंदिराचे सेवक आणि तीन भाविक आहेत. जखमींपैकी भटिंडा येथील एका शीख तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर अमृतसर येथील श्री गुरु रामदास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च येथे उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी भाविकांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. जुल्फान याने भाविकांवर हल्ला का केला, याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहे.