संकुचित, धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतोय; संजय राऊत यांचा निशाणा

आज धुळवड असून अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतो. दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी या प्रमुख नेत्यांच्या घरी होळी साजरी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे, धर्माचे लोक यात सहभागी व्हायचे. पण गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली आहे. आम्ही फार संकुचित होत आहोत. हा संकुचितपणा देशाला, आपल्या समाजाला, हिंदू धर्माला परवडणारा नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आपली प्रतिमा लिबरल, सहिष्णु अशी आहे. म्हणून हिंदू धर्माला जगामध्ये मान आहे. आमच्या धर्माचे रक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेतो. पण दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात आमच्या संस्कृतीतला हा मोकळेपणा संपला, नष्ट केला. दिवसेंदिवस अधिक संकुचित, धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतोय, असेही राऊत म्हणाले.

होळी हा सण सगळ्यांना एकत्र येऊन साजला केला जातो. रंगाची उधळण करून सुख-दु:खात एकत्र येण्याचा हा सण आहे. पण आज देशामध्ये काय चालले आहे? महाराष्ट्रात काय चालले आहे? कुठे मशि‍दींना झाकून ठेवण्याचे वेळ येते, तर कुठे होळी एका बाजुला आणि नमाज दुसऱ्या बाजुला. हे दिवसही निघून जातेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

लाउडस्पीकर बंदी…हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगणाऱ्यांना आता काय झालं? संजय राऊतांचा सवाल

होळी आणि जुम्माची नमाज एकाच दिवशी आल्याने वाद होण्याची गरज नाही. हा वाद कोण करतोय? दोन्ही समाज आपल्या प्रथा, परंपरेचे पालन करून संयमाने आपले सण साजरे करत असतील, प्रार्थना करत असतील तर कोणताही वादविवाद होणार नाही. पण काही लोक याच बहाण्याने देशातील वातावरण गढूळ करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.