Long Weekend- होळी निमित्ताने आलेला लाॅंग वीकेंड पर्यटकांच्या पथ्यावर; हिंदुस्थानातील या ठिकाणांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती!

भटकणाऱ्यांसाठी एखादी मोठी सुट्टी आली की, लगेच बाहेर कुठे जायचं याचे बेत रंगु लागतात. यंदा होळीच्या निमित्ताने आलेल्या सुट्ट्या या भटकंती करणाऱ्यांसाठी दूधात साखर आहेत. होळीच्या निमित्ताने किमान हिंदुस्थानात भटकून येऊया असं म्हणत, अनेकांनी गाड्या काढल्या आहेत. तर दुसरीकडे या दरम्यान विमानकंपन्यांनी सुद्धा आकर्षक सवलतीही देऊ केल्या आहेत.

 

हिंदुस्थानात होळी या सणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हिंदुस्थानात मोठी सुट्टी कधी येते हे बघून महिनाभर आधी प्लॅन आखले जातात. फिरायला जाण्यासाठी अनेक ठिकाणे आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. यामध्ये वृंदावन आणि पुष्कर सारख्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. तर काहींना मात्र थोड्या वेगळ्या वाटा भटकंतीसाठी खुणावत आहेत. यामध्ये पुद्दुचेरी सारख्या विविध ठिकाणांचा समावेश आहे.

उदयपूर हे पर्यटकांची पहिली पसंती मिळवत आहे. तलाव, समृद्ध संस्कृती, भव्य राजवाडे आणि नयनरम्य वातावरणासाठी ओळखले जाणारे उदयपूर शहर होळी वीकेंडसाठी सर्वाधिक शोधले गेले होते. उदयपूरमध्ये जाण्यासाठी मार्च हा महिना उत्तम मानला जातो. या यादीत मुंबई आणि ऋषिकेश दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीपासून फक्त चार तासांच्या अंतरावर असलेले ऋषिकेश त्याच्या होळी उत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे.

इतकेच नाही तर, जग्गनाथ पुरी, वाराणसी, अयोध्या या ठिकाणांना सुद्धा भटकंती करण्यासाठी पहिली पसंती आहे. सध्याच्या घडीला हिंदुस्थानात आध्यात्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढतानाही दिसत आहे. होळी वीकेंड पाहता हिंदुस्थानातील या ठिकाणांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचेही लक्षात आलेले आहे.