
आईच्या आजारपणातील वैद्यकीय देयके मंजूर करण्यासाठी 15 हजारांची लाच मागणाऱ्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील दोन लिपिकांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. वरिष्ठ लिपिक हरीश मराठे व कनिष्ठ लिपिक हेमंत किरपण अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
मुरबाड तालुक्यातील माळ येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याच्या आईच्या आजारपणातील पावणेचार लाख रुपयांची वैद्यकीय देयके डिसेंबर 2024 पासून प्रलंबित आहेत. त्यात पहिले तीन लाख 25 हजार तर दुसरे 50 हजार अशी दोन देयके मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक हरीश मराठे व कनिष्ठ लिपिक हेमंत किरपण यांनी कर्मचाऱ्याकडे 23 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ठरलेल्या 15 हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहापूर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सापळा लावून त्या दोघांना रंगेहाथ अटक केली.