तामिळनाडू सरकारचा केंद्राला दणका, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह वगळलं

तामीळनाडूत हिंदीविरोधातला वाद गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड चिघळला आहे. हिंदी भाषेच्या लादण्यामुळे गेल्या 100 वर्षांत उत्तर हिंदुस्थानातील तब्बल 25 भाषा संपल्या, अशी जळजळीत टीका तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. अशातच आता स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा केंद्राला दणका देत राज्याच्या अर्थसंकल्पातून ‘₹’ हे चिन्ह काढून टाकले आहे. तसेच त्याच्या जागी तामिळ लिपीतील ‘ரூ’ या चिन्हाचा समावेश करण्यात आला आहे.

देशभरातली सर्व राज्यांमध्ये अर्थसंकल्प सादर करताना अधिकृत चिन्ह म्हणून ‘₹’ या चिन्हाचा वापर केला जातो. भाषिक वादामुळे बहुदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी भारताचे अधिकृत ‘₹’ हे चिन्ह राज्याच्या अर्थसंकल्पातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सवर तशा आशयाचा एक व्हिडीओ सुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे. ‘₹’ या चिन्हाएवजी तामिळ लिपीलील ‘ரூ’ या चिन्हाचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. या चिन्हाचा अर्थ तामिळ लिपीतील ‘रु’ असा होतो. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या राज्याने हिंदुस्थानचे अधिकृत ‘₹’ हे चिन्ह बलदले आहे.