
होळीला लाऊडस्पीकर लावायला परवानगी मिळत नाही, उद्या गणेशोत्सव येत आहे. पीओपीच्या मुर्तींवर बंदी आणलेली आहे. हे कसलं हिंदुत्व? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगणाऱ्यांना आता काय झालं? असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, होळीला लाऊडस्पीकर लावायला परवानगी मिळत नाही, उद्या गणेशोत्सव येत आहे. पीओपीच्या मुर्तींवर बंदी आणलेली आहे. हे कसलं हिंदुत्व? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. वर्षातून एकदा येणाऱ्या सणांवर बंधनं आणत आहात. यापूर्वी असं काही झालं नव्हतं. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील, हे तुम्ही सांगत होतात ना, मग आता काय झालं? पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यात महाकुंभमध्ये लोकांना स्नान का करायला लावलं. तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे राष्ट्रीय हरित लवादाचा अहवाल असतानाही त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाची गोष्ट सांगता असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच बलुचिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणात भारताचा सहभाग आहे असा आरोप पाकिस्ताने केला आहे. भारताचा एवढा मोठा हात असता तर चीनने 40 हजार वर्गकिमी जमीन बळकावली आहे ती परत घेतली असती. अरुणाचलमधून चीनला हुसकावून लावलं असतं. हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे. यात भारताला त्यांनी खेचू नये असेही संजय राऊत म्हणाले.