
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत रेल्वेच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. रेल्वेमध्ये प्रवाशांना येणाऱ्या अडचणी पाहता अश्विनी वैष्णव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी (12 मार्च, 2025) रोजी लोकसभेत रेल्वेमधील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या किमती आणि इतर मेनू प्रदर्शित करणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बुधवारी सभागृहात रेल्वेच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेबाबत सविस्तर माहिती दिली. रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सर्व खाद्यपदार्थांची यादी आणि किंमती देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबचे काही छापील मेन्यू कार्ड वेटरकडे दिले जातील तर प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना देखील दिले जातील, असे अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तरात सांगितले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देखील दिली. बेस किचन आणि किचन व्हेईकल्समध्ये नियमित स्वच्छता केली जाईल. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वयंपाकाचे तेल, पीठ, तांदूळ, डाळी, मसाले, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बेस किचन’मध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. यासाठी बेस किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. याशिवाय आयआरसीटीसीचे पर्यवेक्षकही गाड्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. गाड्यांमध्ये चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे यासाठी तपासणी आणि देखरेख यंत्रणेचा भाग म्हणून अन्नाचे नमुने नियमितपणे घेतले जात आहेत, असे अश्विनी वैष्णव यावेळी सांगितले.