‘पाट्या’ टाकणाऱ्या 3687 दुकानदारांना दणका, मराठीद्वेष्ट्यांकडून 1 कोटी 10 लाखांची वसुली, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईसह महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक मराठीत लावणे बंधनकारक असताना मराठीद्वेष्ट्या मुजोरांकडून ‘मराठी पाट्या’ लावणे टाळले जात आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिकेकडून मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात धडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत 3687 दुकानदारांना दणका देताना तब्बल 1 कोटी 20 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुकाने-आस्थापना मुंबईत तर फलक मराठीतच असला पाहिजे, असा निर्वाणीचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

मार्च 2022 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने-आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर कारवाई सुरू आहे.

मुंबईतील दुकानांची स्थिती

मुंबईत 9 लाख दुकाने, आस्थापने, हॉटेल, कार्यालये आहेत. यात दुकाने 3 लाख 72 हजार 819 आहेत. 1159 प्रकरणांत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला.

अशी झाली कारवाई

  • पालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत आतापर्यंत 1 लाख 5 हजार 600 ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली आहे.
  • यामध्ये 1 लाख 10 हजार 914 ठिकाणी मराठीत पाट्या आढळल्या. 3687 ठिकाणी मराठी पाट्या नव्हत्या.
  • पालिकेने कारवाई केलेल्या 2255 प्रकरणांतील आतापर्यंत 1871 खटले निकाली निघाले आहेत.
  • मराठी पाटी नसल्यास नियमानुसार प्रतिकामगार दोन हजार रुपये या प्रमाणे दंड आकारण्यात येत आहे.