उत्तर प्रदेशात रंगपंचमीच्या दिवशी मशिदींवर ताडपत्री टाकणार, धार्मिक तेढ वाढू नये म्हणून योगी सरकारचा निर्णय

रंगपंचमीच्या निमित्ताने धार्मिक तेढ वाढू नये याकरिता उत्तर प्रदेशमधील काही जिह्यांतील मशिदी ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर हिंदू समुदायाने दुपारी 2.30 वाजेपर्यंत रंगपंचमी खेळावी. त्यानंतर मुस्लिम समाजातील लोक नमाज पठण करतील, अशी नियमावली दोन्ही धर्मांतील पुढाऱ्यांच्या परस्पर संमतीने पोलिसांनी आखून दिली आहे.

संभलमधील मुस्लिम समुदायाने पुढाकार घेत रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गात येणाऱ्या दहा मशिदी झाकण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळांचे संरक्षण परस्पर संमतीने केले जाईल, असे संभलच्या वरिष्ठ पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपैय्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. संभलमधील वादग्रस्त शाही जामा मशिददेखील ताडपत्रीने झाकण्यात येणार आहे.

मशिदीचे रंगकाम एका आठवड्यात करा

संभल येथील जामा मशिदीचे रंगकाम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी मशिदीच्या बाहेरील भिंती रंगवून तिथे दिवे बसवण्याचे निर्देश दिले.