पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मॉरिशसचा ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. मॉरिशसची नवीन संसद इमारत बांधण्यास हिंदुस्थान मदत करणार असल्याचे आश्वासन मोदींनी या वेळी दिले.

मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले हिंदुस्थानी ठरले असून कोणत्याही देशाने मोदींना दिलेला हा 21वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. 12 मार्च 1968 रोजी मॉरिशस ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला. मॉरिशस हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतो. मुसळधार पावसात जवानांनी आपल्या कसरती दाखवल्या. मोदी दोन दिवसांचा मॉरिशस दौरा आटपून हिंदुस्थानला रवाना झाले आहेत.