
महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन योजनेला स्थगिती देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा नाही, गुलाबी रिक्षाच्या घोषणेला बजेटमध्ये निधी नाही, तीर्थक्षेत्र योजना बंद केली, लाडक्या बहिणींना साडी नाही, फसवी लखपती दीदीची योजना, महिलांची अस्मिता योजना बंद केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजनांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे विविध योजनांना स्थगिती देणारे महायुतीचेच सरकार आहे, अशा शब्दांत शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना वरुण सरदेसाई यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या घोषणा केलेल्या नाहीत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोणतीही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वांद्रे शासकीय वसाहतींच्या पुनर्विकासाचा जीआर जारी केला, पण बजेटमध्ये शासकीय वसाहतींच्या पुनर्विकासांचा कोणताही उल्लेख नसल्याबद्दल वरुण सरदेसाई यांनी खंत व्यक्त केली.
मुंबईसाठी 65 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली, पण या सर्व योजना पालिकेच्याच आहेत. सध्या संपूर्ण मुंबई खणून ठेवली आहे. नाले तुंबले आहेत. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यावर काहीही ठोस उपाय योजना नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक वर्षी 205 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही वरुण सरदेसाई यांनी केली.