
रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. एकाच परिसरात सर्वसामान्य आणि उच्चभ्रू लोकवस्ती असते. अशा वेळी त्या परिसरात घरांची खरेदी करताना सरसकट रेडी रेकनरचे दर लावले जातात. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. त्यामुळे रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र ’व्हॅल्यू झोन’ ठरवले जातात. रेडी रेकनर दर ठरविताना गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. रेडी रेकनरच्या दरात सरकार 10 ते 12 टक्के वाढ करणार असल्याची चर्चा निराधार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद सदस्य सुनील शिंदे, अॅड. अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्कसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.