
होली हैं… बुरा ना मानो होली हैं… म्हणत कोणावरही साध्या पाण्याचे किंवा रंगमिश्रित पाण्याचे फुगे मारणे, महिला-तरुणींना पाहून अश्लील भाष्य, कृत्य करणे महागात पडू शकते. होळी आणि धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटा, पण शिस्तीचे पालन करा. रंगाचा बेरंग करताना कोणी सापडला तर क्षमा केली जाणार नाही, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
सण साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. नियम पायदळी तुडवू नका, जाणीवपूर्वक कोणी मस्ती करताना सापडलाच तर कारवाई अटळ आहे. दारू ढोसून गाडय़ा चालवू नका, बेकायदेशीर दारूची तस्करी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरात तगडा बंदोबस्त
होळी व धुळवडीच्या दिवशी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. 7 अपर पोलीस आयुक्त, 11 पोलीस उपायुक्त, 11 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1675 पोलीस अधिकारी आणि 14,798 पोलीस अंमलदार बंदोबस्तात तैनात असणार आहेत. याशिवाय एसआरपीएफ, क्यूआरटी, बीडीडीएस, होमगार्ड आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या पथकांचादेखील समावेश असणार आहे.
कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात असणार आहेत. गस्ती पथके, नाकाबंदी आणि ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.