
अर्थमंत्री अजित पवार यांनी का आम्हाला सत्ता मिळाली याची जाण आहे! काय करायचे याचे भान आहे! अशी काव्यपंक्ती करत अर्थसंकल्प मांडला. पण त्यात केवळ पोकळ संकल्पांचे बुडबुडे दिसले, अशी टीका शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केली.
आमदार जामसुतकर म्हणाले की, ‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काहीच उल्लेख नाही. महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. राज्यातील शेतकरी या सरकारला कदापि माफ करणार नाहीत. शेतकरी सन्माननिधी 12 हजारांवरून 15 हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करूनही अर्थसंकल्पात काहीच नाही. लाडक्या बहिणींचाही अपेक्षाभंग केला,’ असे जामसुतकर म्हणाले.
अर्थसंकल्प मांडताना मुंबईतील अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाची आठवण शासनाला झाली नाही. शिवभोजन थाळी योजनेबाबत काहीच नमूद करण्यात आलेले नाही. आरोग्य विभागाने 11 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. तीर्थदर्शन योजनेसाठीही काहीच तरतूद नाही, असे जामसुतकर म्हणाले.