सावध रहा! सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढले, 9 महिन्यांत 197 कोटींचे नुकसान

गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे, मात्र यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. देशभरात प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे सायबर फसवणुकीच्या घटना घडत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत सायबर फसवणुकीमुळे 107.21 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लोकसभेत सायबर फसवणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात आले. लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2014-15 या आर्थिक वर्षात सायबर फ्रॉडच्या 845 प्रकरणांची नोंद झाली होती आणि एकूण 18.46 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत हा आकडा 107.21 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडे जे आकडे नोंदवलेले आहेत त्यावरून ही माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली. यावरून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण किती वाढलंय याचा अंदाज येतो.

सायबर फसवणुकीतून 2014-15 या आर्थिक वर्षात 18.46 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. 2015-16 मध्ये नुकसानीचा आकडा 27 कोटी रुपये इतका झाला. चालू आर्थिक वर्षात तर नुकसानीचा आकडा अवघ्या नऊ महिन्यांत 100 कोटींच्या पार गेला. 2023-24 या आर्थिक वर्षात 177 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती.

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, फिशिंग हल्ले, अपूर्ण केवायसी अपडेट, हॉटेल बुकिंग आणि कुरिअर डिलिव्हरी घोटाळे अशा विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, कोणालाही बँक डिटेल्स शेअर करू नका. फसवणुकीसंदर्भात सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर तक्रार करा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.