
भाजपशासित उत्तर प्रदेश राज्यात मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली असताना आता बनावट पदव्याही सर्रास मिळत असल्याचे उघड झाले आहे. गोरखपूर येथील रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या डॉक्टरकडे एमबीबीएसच्या तब्बल 21 आणि डीफार्माच्या 9 बनावट पदव्या सापडल्या आहेत. तसेच त्याच्याकडे युनानी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून अनेक पदव्या आढळून आल्या आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. डॉ. राजेंद्र कुमार असे या अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याकडे एमबीबीएसची बनावट पदवी आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 21 एमबीबीएस आणि 9 डी फार्माच्या पदव्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दोन पदव्या लखनऊ आणि शिकोहाबाद येथील विद्यापीठाच्या नावाने आहेत. पोलीस पथकाने विद्यापीठात चौकशी केली असता या चारही पदव्या बनावट असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, आरोपी डॉक्टरकडे युनानी आणि आयुर्वेदाच्याही बनावट पदव्या सापडल्या.