
>> वैश्विक, [email protected]
नाही! लेखाचं शीर्षक कोणत्याही भयकथेचं किंवा ‘हॉरर’पटाचं नाही. हा सरळ साधा वैज्ञानिक प्रवास आहे एका यानाचा. ते यान नुकतंच चंद्रावर उतरलं. त्याचं नाव ‘ब्लू घोस्ट’ म्हणून त्याला ‘निळं भूत’ म्हटलं इतकंच.
आता चंद्रावर काही कुठलं यान पहिल्यांदाच उतरलेलं नाही. रशियाचं ‘ल्यूना-1’ हे यान पृथ्वीवरच्या माणसाने चंद्रावर पाठवलेलं पहिलं कृत्रिम, यांत्रिक यान होतं. 1957 मध्ये अंतराळात ‘स्पुटनिक-1’ पाठवल्यापासून सोविएत रशियाची अंतराळातील वेगवान दौड सुरू झाली. थोड्याच काळात चंद्रावर ल्यूना-1 पाठवण्यात त्यांना 1959 मध्ये यश आलं. तोपर्यंत चंद्राला माणसाचा अप्रत्यक्षसुद्धा स्पर्श झाला नव्हता.
त्यानंतरचा चांद्रविजय जगात गाजला तो अपोलो – 11 रॉकेटवर असलेल्या ‘इगल’ यानातून. 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्डिन हे चंद्रावर उतरले तेव्हा चंद्र ‘पादाक्रान्त’ झाल्याने अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने मोठं पाऊल पडलं. यानंतर अनेक देशांनी क्रमाक्रमाने चंद्रावर यानं पाठवली. आपण 2008 मध्ये ‘चांद्रयान-1’ यशस्वीरीत्या चंद्रावर उतरवलं. नंतरचं दुसरं फसलं, पण तिसऱ्या वेळी पुन्हा यश प्राप्त झालं.
म्हणजे चंद्रावर जाणं ही आता विस्मयकारी गोष्ट राहिलेली नाही. मग या ‘निळय़ा भुता’ची चर्चा कशासाठी?… तर त्याचं महत्त्व असं की, ‘फायर फ्लाय’ नावाच्या कंपनीने हे यान चंद्रावर धाडलं. आतापर्यंतची सर्व यानं विविध सरकारांच्या मदतीने चालणाऱ्या संस्थांनी पाठवली होती. अमेरिकेची ‘नासा’ किंवा आपल्या ‘इस्रो’प्रमाणे जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये सरकारी मदतीने चालणारे स्पेस-प्रकल्प आहेत. पण कुणा खासगी कंपनीने आपलं यान चंद्रापर्यंत न्यावं ही ‘ब्लू घोस्ट’च्या रूपाने घडलेली पहिलीच घटना आहे.
वास्तविक आकाशातील विराट निळाईचा रंग मन प्रसन्न आणि शांत करणारा. मग त्यात ‘फायर फ्लाय’ला ‘घोस्ट’ कुठून दिसलं? ते जाणून घ्यायला नेटची मदत घ्यावी लागली. ‘ब्लू घोस्ट’ म्हणजे ‘भूत’ नसून एक प्रकारच्या काजव्याचं नाव आहे. तो दुर्मिळ प्रजातीत समाविष्ट असून त्याचा प्रकाश निळसर हिरवा असतो. या नावाचा भयकारी ‘भुता’शी काहीही संबंध नाही. आपल्याकडे ‘भूत’ शब्द कोणत्याही प्राणीमात्रासाठी वापरला जातो.
‘फायर फ्लाय एअरोस्पेस’ ही टेक्सास राज्यातील एक खासगी पंपनी आहे. ‘फायर फ्लाय’ म्हणजेही काजवा. म्हणूनच या कंपनीने बनवलेल्या आणि ‘नासा’च्या सहाय्याने पहिलं खासगी यानं चंद्रावर उतरवणाऱ्या या कंपनीचं नाव चांद्र-इतिहासात नोंदलं गेलंय.
ही कंपनी मीडियम लिफ्ट लाँच वेहिकल तयार करते. अशा प्रकारे या पंपनीद्वारे कमर्शिअल उपग्रह पृथ्वीभोवतीच्या कक्षेत (सुमारे 200 ते 400 किलोमीटर) पाठवले जातात. या कंपनीची स्थापना 2014 मध्ये झाली. 215 एकर जमीन घेऊन तिथे ‘लाँच वेहिकल’च निर्मिती आणि चाचणी घेण्याचे प्रयोग सुरू केले. त्यांनी लहान आकाराचे ‘क्रायोटॅन्क’सुद्धा बनवले. त्याची तपासणी ‘नासा’च्या फ्लाईट-सेन्टरकडून करून घेतली छोटय़ा उपग्रहांचा ‘व्यवसाय’ करणे हा कंपनीचा उद्देश आहे.
‘फायर फ्लाय एअरोस्पेस’ आकाराला आल्यावर त्यांनी 2018 मध्ये युव्रेनमध्ये ‘आर अँड डी’ केंद्र स्थापन केलं. त्याच वर्षी नासा संस्थेने या कंपनीची क्षमता लक्षात घेऊन चंद्रावर व्यापारी तत्त्वावर यानं उतरवण्यासाठी निवड केली. 2021 मध्ये ‘फायर फ्लाय’च्या पहिल्या ‘टेस्ट फ्लाइट’ने भरारी घेतली.
15 जानेवारी 2025 रोजी या कंपनीचे ‘ब्लू घोस्ट’ चंद्राकडे निघाले आणि 2 मार्च 2025 या दिवशी चंद्रावर सुखरूप उतरले. हे यान 150 किलो वजनाचे आहे. हे यान चार पायांचे आहे. त्यावरच्या यंत्रणा सुमारे 95 किलो आहे. ‘ब्लू घोस्ट’ चंद्रावरच्या ठिसूळ मातीचा अभ्यास करेल, त्यासाठी चांद्रपृष्ठावर 7 ते 10 फूट खणून या ठिसूळ मातीचे नमुने घेतले जातील आणि चंद्रपृष्ठाखाली किती खोलगट भागात किती तापमान आढळले याची नोंद केली जाईल. चंद्रावरचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) तपासेल.
एक गंमत गोष्ट. ‘ब्लू घोस्ट’ हे नाव दुसऱ्या महायुद्धात (1939 ते 45) एका युद्धनौकेला देण्यात आले होते. ती नौका बुडाल्याच्या अफवा अनेकदा पसरल्या, पण नंतरच्या एका लढाईत ‘प्रकट’ होऊन या नौकेने चांगली कामगिरी बजावली. या नौकेचा हा ‘चिवटपणा’ पाहून तिला हे नाव देण्यात आले असावे, परंतु चंद्रावतरण केलेले यान मात्र छोटासा ‘काजवा’च मानला पाहिजे. यावरून एक लक्षात यावं की, आता खासगी संस्थांनीही अंतराळाकडे ‘व्यापारी’ दृष्टीने पाहण्याचा गंभीर विचार सुरू केलाय. इलॅन मस्क तर मंगळावर जायचं म्हणतात. मात्र ‘ब्लू घोस्ट’सारखी संशोधक यानं पुढच्या महामोहिमांना पूरक अशी माहिती गोळा करत असतात.