Ratnagiri News – हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. कोकणात शिमगोत्सवाची धूम

हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे… होरयो… कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू असून गुरुवारी (13 मार्च 2025) गावोगावी दणक्यात शिमगा साजरा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 हजार 883 ठिकाणी शिमगोत्सव साजरा होणार आहे. त्याचबरोबर एक हजार ठिकाणी पालखी उत्सव रंगणार आहे. त्यामुळे कोकणात सध्या शिमगोत्सवाजी धुम सुरू झाली आहे. तसेच शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी दाखल झाला आहे. त्यामुळे गावांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री गावागावात होम होणार आहेत. यावेळी जोरदार फाका देत शिमगा साजरा होणार आहे. एक हजार ठिकाणी पालखी उत्सव रंगणार असून ग्रामदैवताची पालखी नाचवण्याचा नयनरम्य सोहळा पाहता येणार आहे. ग्रामस्थ ग्रामदैवतेचे दर्शन घेऊन हातभेटीचा नारळ अर्पण करतात. काही जणांचे नवस फेडले जातात. रत्नागिरीतील वारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीभैरीबुवांची पालखी रात्री मंदिरातून बाहेर पडते. त्यावेळी दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. शिमग्यासाठी चाकरमानी गावी येत असल्यामुळे कोकण रेल्वेच्या गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळानेही जादा गाड्या सोडल्या आहेत.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक महिना अगोदरच तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, 24 गावांमध्ये मानपानावरून वाद होते. त्या गावात जाऊन पोलिसांनी बैठका घेतल्या. काही गावात उपविभागीय अधिकारी गेले तर काही गावात स्वतः गेलो आहे. 24 गावांपैकी 17 गावातील तंटे मिटवण्यात आम्हाला यश आले आहे. तेथील सर्व लोक एकत्र येऊन होळी साजरी करतील. उरलेल्या 7 गावामध्ये अजूनही बैठका सुरू आहेत. त्यापैकी 5 गावांमधील तंटे मिटतील अशी अपेक्षा आहे. उर्वरित 2 गावांमध्ये मात्र आम्ही निर्बंधाच्या नोटीस पाठवल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पोलिसांबरोबर एसआरपीएफचे पथक आणि साडेतीनशे होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे त्यांनी सांगितले.