गरज पडल्यास तानाजी सावंत यांना तुरुंगात टाका, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तानाजी सावंत हे जेव्हा आरोग्यमंत्री असताना 10 हजार कोटी रुपयांचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाला होता असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी, गरज पडल्यास सावंत यांना तुरुंगात पाठवा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा हा घोटाळा हा 10 हजार कोटी रुपयांचा होता. तेव्हाही हा विषय आम्ही मांडला होता आणि आमची अपेक्षा होती की यावर काही कारवाई व्हावी. तानाजी सावंत आज मंत्रिमंडळात नाही, असे असले तरी सावंत यांची चौकशी व्हावी, गरज पडल्यास त्यांना तुरुंगात पाठवावे. या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयातील कुणाचा हात होता का याचाही तपास व्हावा या प्रकरणात कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांचा यात समावेश होता अशी माहिती आमच्याकडे आहे. तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मुख्यमंत्र्यांनी याची पारदर्शक चौकशी करावी.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी. आज तुम्ही 108 वर फोन करा बघा रुग्णवाहिका येते का? तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका घेतल्या होत्या त्यात 10 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता, तो लोकांसमोर आणला या त्या निर्णयार स्थगिती लागली. पण पुढचं पाऊल काय हे सरकारने सांगावं असेही आदित्य ठाकरे म्हणाले.