केजरीवाल दोषी असतील तर मोदी, अमित शहा, नड्डा हे देखील दोषीच! संजय सिंह यांचा आरोप

होर्डिंग प्रकरणी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हे प्रकरण 2019 मधील आहे. द्वारका येथे मोठे होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल, माजी आमदार गुलाब सिंह आणि नगरसेवक नीतिका शर्मा यांना आरोपी केले आहे. याबाबत आता संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी या प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात जर अरविंद केजरीवाल दोषी असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा, प्रवेश वर्मा, मनोज तिवारी हेदेखील दोषी आहेत, असे सिंह यांनी सांगितले. याबाबत संजय सिंह यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे न्यायालयाचा आदेश आहे, असे ते म्हणाले.

प्रसार माध्यमांनी पत्राचे योग्यप्रकारे वार्तांकन केले नाही. तक्रारदाराने केवळ अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्धच नाही तर अनेक प्रमुख नेत्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यात नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासोबत मनोज तिवारी, प्रवेश वर्मा, रमेश बिधुरी, अरविंद केजरीवाल आणि गुलाब सिंह यादव यांचीही नावे आहेत. मात्र, प्रसार माध्यमांनी हे पत्र प्रसिद्ध केले तेव्हा त्यातून भाजप नेत्यांची नावे वगळण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात त्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. याप्रकरणी संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हटले की, जर अरविंद केजरीवाल दोषी असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि इतर भाजप नेते देखील दोषी आहेत.